
वीज तारेचा शॉक लागून दोन गाभण म्हशींचा दुर्दैवी मृत्यू
देवरुख येथील कुंभ्याचा दंड परिसरात माळरानावर चरत असताना तुटून पडलेल्या वीज तारेचा शॉक लागून दोन गाभण म्हशींचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना आज शनिवारी दुपारी १२:३० वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत शेतकरी अमोल कोळी यांचे सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाले असून, त्यांना महावितरणकडून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
देवरुख येथील अमोल कोळी यांच्या मालकीच्या दोन मुरा जातीच्या म्हशी होत्या. इतर जनावरांप्रमाणे त्या नेहमी मार्लेश्वर तिठ्याजवळील माळरानावर चरायला जात असत. आज दुपारीही त्या चरावयास गेल्या होत्या. त्याचवेळी, माळावर तुटून पडलेल्या वीज तारेच्या संपर्कात आल्याने दोन्ही म्हशींना विजेचा जोरदार धक्का बसला आणि त्यातच त्यांचा जागीच मृत्यू झाला.