
रत्नागिरीत प्रथमच निघणार कावडयात्रा
सकल हिंदू समाजातर्फे सोमवारी आयोजन
रत्नागिरी : सकल हिंदू समाजातर्फे येत्या सोमवारी दि. ४ ऑगस्ट रोजी प्रथमच कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील शिवभक्तांसाठी ही पर्वणी ठरणार आहे. कावड यात्रेचे पहिलेच वर्ष असून यात्रेचे नियोजन व व्यवस्थापनाची पहिली बैठक मारुती मंदिर येथील विवा एक्झिक्युटीव्ह येथे झाली.
या वेळी मरुधर विष्णू समाजाचे दीपक देवल, चुन्नीलाल सोळंकी, नरपत सिंह परिहार, वीरम सिरवी, धनराज चौधरी आदींसह सकल हिंदु समाजाचे कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते. पवित्र श्रावण महिन्यात शिव शंभूच्या चरणी सर्व शिवभक्तांसाठी कावड यात्रा आयोजित करण्यात येणार आहे. श्रावण महिन्याचा पवित्र काळ चालू आहे. गंगाजल घेऊन भगवान शिवाच्या चरणी अर्पण करण्याची अनोखी संधी म्हणजे कावड यात्रा.
खेडशी, स्वामीनगर येथील श्री मरूधर विष्णू समाज भवन येथे एकत्रित होऊन कावड यात्रेला ४ ऑगस्ट रोजी सकाळी 7 वाजता सुरवात होणार आहे. खेडशी, कुवारबाव, साळवी स्टॉप, मारुती मंदिर, जेलनाका, कै. अरुअप्पा जोशी मार्गावरून गोगटे-जोगळेकर महाविद्यालय येथून राजीवडा येथील श्री काशिविश्वेश्वर मंदिर येथे कावड यात्रा पोहोचेल. बम बम भोले- शिवहरी- हर हर महादेवच्या गजरात कावडमधून आणलेल्या पवित्र जलाने श्री काशिविश्वेश्वर महादेवावर अभिषेक केला जाणार आहे.
दरवर्षी सकल हिंदु समाजातर्फे हिंदु नववर्ष स्वागतयात्रा, आषाढी एकादशीला आषाढीवारीचे मोठ्या उत्साहात आयोजित करत आहोत. त्यानिमित्ताने सकल हिंदू समाज एकत्र येत आहे. आता कावड यात्रेच्या निमित्ताने हिंदु बंधु-भगिनींची एकी दृढ होणार आहे. या यात्रेत सहभागी होऊन आणि आपल्या मन, शरीर व आत्म्याला शिवमय करता येईल. यात जास्तीत जास्त भाविकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन दीपक देवल (9422630621), देवेंद्र झापडेकर (917020024242), श्री काशिविश्वेश्वर देवस्थानच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.