
मुख्याध्यापक अविनाश जोशी यांचे शैक्षणिक, सामाजिक योगदान अमूल्य- पालकमंत्री उदय सामंत
रत्नागिरी : धामणसे विद्यामंदिरचे मुख्याध्यापक अविनाश जोशी यांचे भगव्याशी नातं हे जिव्हाळ्याचं आणि निष्ठेचं आहे. आता त्यांच्या आयुष्यातील निवृत्तीनंतर समाजसेवेचा टप्पा सुरू होत आहे. त्यांची जिद्द, चिकाटी आणि सेवाभाव नव्या पिढीला नेहमीच प्रेरणा देत राहील. गावाच्या शैक्षणिक व सामाजिक विकासासाठी त्यांनी केलेले योगदान अमूल्य आहे, असे प्रतिपादन राज्याचे उद्योगमंत्री, मराठी भाषामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी केले.
धामणसे येथील माध्यमिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या धामणसे हायस्कूलचे मुख्याध्यापक अविनाश जोशी यांच्या सेवानिवृत्ती सोहळ्यात मंत्री बोलत होते. या वेळी सामंत यांच्या हस्ते जोशी यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तसेच ऋणानुबंध या विशेष स्मरणिकेचं प्रकाशन करण्यात आले. हायस्कूलमध्ये नावीन्यपूर्ण उपक्रम सुरू करण्यासाठी जोशी सरांनी मार्गदर्शन करावे. त्यासाठी जिल्हा नियोजनमधून निधी देऊ, अशी ग्वाही सामंत यांनी दिली. तसेच मी विशेष प्रयत्न केल्यामुळेच आज जिल्हा परिषदेचे विद्यार्थी आता इस्रो, नासामध्ये सहभागी होत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले.
या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री उमेश कुलकर्णी यांनी केले आपल्या खुमासदार निवेदन शैलीत त्यांनी जोशी सरांचे व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू उलगडून दाखवले व त्यांच्या सेवा काळातील अनेक आठवणींना उजाळा दिला. त्यांचे किस्से जोशी सरांनी सरपंच पदाची निवडणूक लढवली त्यावेळेला आलेले अनुभव आणि जोशी सरांनी गावात अनेक सामाजिक कामांसाठी केलेली निरहेतुक मदत यावर त्यांनी प्रकाश टाकला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक माध्यमिक शिक्षण प्रसारक संस्थेचे सचिव श्री विलास पांचाळ यांनी केले त्यांनी आपल्या मनोगतात हायस्कूलच्या स्थापनेपासूनच्या 31 वर्षांचा काळ उलगडून दाखवला. संस्थेच्या स्थापनेची इच्छा त्यात आलेल्या अनंत अडचणी यावर मात करत संस्था कशी कार्यरत आहे हे त्यांनी सांगितले.
धामणसे गावाचे सरपंच आणि धामणसे हायस्कूलचे माजी विद्यार्थी श्री अमर रहाटे यांनी आपल्या मनोगतात जोशी सरांचा शिक्षक म्हणून आपल्यावर कसा प्रभाव आहे हे सांगितलेच तसेच धामणसे हायस्कूल टिकून राहावे यासाठी पालकांसोबतच माजी विद्यार्थ्यांनीही प्रयत्न करणे तितकेच गरजेचे आहे हे सांगितले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर चंद्रशेखर निमकर यांनी जोशी सरांबद्दल गौरव उद्गार आपल्या भाषणात काढले.
यावेळी आलेल्या सर्व मान्यवरांना सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले तसेच ऋणानुबंध या जोशी सरांच्या आठवणींना उजाळा देणाऱ्या स्मरणिकेचे प्रकाशन देखील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
सत्कारमूर्ती अविनाश जोशी व सौ. अपर्णा जोशी या दांपत्याचा धामणसे परिसरातून विविध संस्था, विद्यालय, गावातील विविध संस्था, माजी विद्यार्थी यांच्याकडून सत्कार व गुणगौरव करण्यात आला. माजी विद्यार्थी नितीन जाधव व भीमेश जाधव (संचालक, माध्यमिक शिक्षण प्रसारक मंडळ) यांनी विद्यार्थीदशेतील सरांचे अनुभव कथन केले. विविध मान्यवरांनी सरांविषयी गुणगौरवपर भाषण केले. श्री. जोशी सर यांचे विद्यालयात विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ, संचालक, शिक्षणप्रेमी, सामाजिक, राजकीय, प्रतिष्ठित कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी सरपंच अमर रहाटे, उपसरपंच ऋतुजा कुळकर्णी, संस्थाध्यक्ष मुकुंद जोशी, श्री रत्नेश्वर ग्रंथालयाचे अध्यक्ष उमेश कुळकर्णी, विलास पांचाळ, तारक मयेकर, संस्थेचे सचिव विलास पांचाळ, खजिनदार विश्वास धनावडे, माजी जि. प. उपाध्यक्ष राजेश मुकादम, स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन, माजी संचालक व माजी सरपंच नथुराम पांचाळ, माजी उपसरपंच अनंत जाधव माजी सरपंच दत्ताराम चव्हाण, रत्नागिरी जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सदस्य व श्री स्वामी समर्थ विद्यालयाचे (देऊड) मुख्याध्यापक शैलेश पुजारी, आगरनरळ येथील ज्ञानमंदिर विद्यालयाचे अरुण जाधव, माजी केंद्रप्रमुख पुरुषोत्तम केळकर, न्यू इंग्लिश स्कूल व मीनाताई ठाकरे कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्य शोभा खोत, माजी जि. प. सभापती अरुण पेडणेकर, विद्यालयाचे आजी-माजी विद्यार्थी व गावातील प्रतिष्ठित व्यक्ती व नवनिर्वाचित मुख्याध्यापक संजय सुतार व विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते.