
मिरकर वाडा येथील आज दुपारी झालेल्या खून प्रकरणात आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले
मिरकर वाडा येथील आज दुपारी झालेल्या खून प्रकरणात आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे खून झालेल्या इसमाचे नाव प्रिन्स सहानी असल्याचे कळते खून करणारा आरोपी मृताचा मामा होता
मिरकरवाडा येथील खडक मोहल्ला परिसरात एका नव्याने सुरू होणाऱ्या मोबाईल दुकानाचे फर्निचरचे काम गोरखपूर येथील चार कामगार करत होते. या कामगारांमध्ये प्रिन्स सहानी आणि त्याचा चुलत मामा यांचा समावेश होता. त्यांच्यात गावातील एका मुलीच्या प्रेमप्रकरणावरून वाद सुरू होता. हा वाद इतका विकोपाला गेला की, रागाच्या भरात मामाने सुतारकामासाठी वापरण्यात येणारे धारदार हत्यार (आरी) भाच्याच्या छातीत खुपसले. या वर्मी घावामुळे प्रिन्सचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेनंतर आरोपीने तात्काळ घटनास्थळावरून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच ११२ क्रमांकावर फोन करून पोलिसांना कळवण्यात आले. माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि तपासाची सूत्रे वेगाने फिरवली. पोलिसांनी एक पथक घटनास्थळी तर दुसरे पथक रेल्वे स्थानकावर पाठवले. पोलिसांनी रेल्वे स्थानकावरून पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या दोन संशयितांना ताब्यात घेतले. या संशयितांचे मोबाईल लोकेशन पोलिसांना मिळाल्याने आरोपींच्या पोलिसांनी काही तासातच मुसक्या आवळल्या