
कोकणातील ग्रामीण जीवन अतिशय सुरेख पद्धतीने युट्यूबच्या माध्यमातून जगासमोर आणणाऱ्या ‘रेड सॉईल स्टोरीज’ या चॅनेलचा निर्माता शिरीष गवस यांचे दुःखद निधन
कोकणातील ग्रामीण जीवन अतिशय सुरेख पद्धतीने युट्यूबच्या माध्यमातून जगासमोर आणणाऱ्या ‘रेड सॉईल स्टोरीज’ या चॅनेलचा निर्माता शिरीष गवस यांचे अवघ्या तेहतीस व्या वर्षी दुःखद निधन झाल्याची बातमी समोर आली आहे.या बातमीमुळे शिरीष गवस आणि पूजा गवस या जोडप्याच्या चाहत्यांना जबर धक्का बसला आहे. काही दिवसांपूर्वीच गवस दाम्पत्याने आपल्या मुलीचा पहिला वाढदिवस साजरा केला होता. मुलीच्या वाढदिवसाचा व्हिडीओही रेड सॉइल स्टोरीजवर शेअर केलेला होता. या व्हिडीओखाली आता त्यांचे चाहते कमेंट करून दुःख व्यक्त करत श्रद्धांजली वाहत आहेत.
करोना काळात जेव्हा जग थांबले होते, तेव्हा मुंबईतील शिरीष गवस आणि त्याची पत्नी पूजा गवस यांनी एक वेगळेच ध्येय उराशी बाळगले. शिरीष आयटी क्षेत्रात काम करायचा, पत्नी पूजा सिनेसृष्टीत काम करत होती. करोनामुळे ब्रेक लागल्यानंतर दोघांनीही सिंधुदुर्गातील आपल्या गावात जाण्याचा निर्णय घेतला. गावातील जीवनशैली, तिथली खाद्यसंस्कृती, लोकांचे दैनंदिन जीवन, त्यात येणारी आव्हाने, गमतीजमती या सर्व घटना गवस दाम्पत्याने युट्यूबच्या माध्यमातून जगासमोर आणल्या.
शिरीष गवस आणि पूजा गवस यांनी करोनानंतर युट्यूबवर Red Soil Stories हे चॅनेल सुरू केले होते. सध्या त्यांच्या चॅनेलचे ४ लाख २७ हजार सबस्क्राइबर्स आहेत. गवस जोडप्याने आतापर्यंत या चॅनेलवर १६१ व्हिडीओ तयार करून अपलोड केलेले आहेत.
सिंधुदुर्गातील दोडामार्ग येथील सासोली येथे राहणारा शिरीष गवस काही दिवसांपासून मेंदूंशी निगडित आजाराने त्रस्त होता. त्याच्यावर गोव्यातील एका रुग्णालयात उपचार सुरू होते, अशी माहिती मिळत आहे. मात्र अखेर त्याचा दुःखद मृत्यू झाल्याची बातमी समोर आली.