
UPI वर आता वारंवार बॅलेन्स तपासता येणार नाही, दिवसभराची मर्यादा ठरली! ऑटो पे सुरू असलेल्यांसाठी महत्वाची अपडेट!
मुंबई : तुम्ही मोबाईल फोन ॲप वापरून एखाद्याला पैसे ट्रान्सफर करत असाल, फळे, भाज्या, दूध किंवा इतर कोणत्याही वस्तू खरेदी करण्यासाठी ऑनलाईन ॲप वापरून पेमेंट करत असाल किंवा इतर कोणत्याही आर्थिक व्यवहारासाठी पेमेंट ॲप वापरत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. आज शुक्रवार, 1 ऑगस्टपासून देशभरात UPI पेमेंट सिस्टीमशी संबंधित नवीन नियम लागू झाले आहेत. आजपासून होणाऱ्या या बदलांचा तुमच्या ॲप आणि तुमच्या दैनंदिन डिजिटल सवयींवर थेट परिणाम होईल.
UPI चे नवीन नियम आजपासून लागू
तुम्ही दिवसातून अनेक वेळा UPI वापरून व्यवहार करत असाल, बॅलन्स तपासत असाल किंवा पेमेंट स्टेटस तपासत असाल तर आजपासूनच तुमची ही सवय बदला कारण आता यावर मर्यादा घालण्यात आली आहे. NPCI म्हणजे नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने UPI सर्व्हरवर वाढत्या लोड आणि वारंवार आउटेजची समस्या टाळण्यासाठी हे पाऊल उचलले आहे. आजपासून तुमच्यासाठी कोणकोणते बदल झाले आहेत पाहूया.
NPCI च्या माहितीनुसार आतापर्यंत UPI वरून 16 अब्ज व्यवहार व्हायचे तर एप्रिल आणि मे महिन्यात UPI बंद पडल्याच्या अनेक तक्रारी आल्या होत्या. दर काही मिनिटांनी बॅलन्स तपासणे किंवा पेमेंट स्टेटस वारंवार तपासणे यासारख्या API कॉल्सच्या ओव्हरलोडमुळे बहुतेक समस्या आल्या होत्या. पण आता नवीन नियमांमुळे सिस्टमवरील दबाव कमी होणार नाही तर तुमचा व्यवहार पूर्वीपेक्षा अधिक सुरळीत आणि विश्वासार्ह होईल.
1. बॅलन्स चेक मर्यादा
आजपासून म्हणजे 1 ऑगस्टपासून तुम्ही तुमच्या बँक अकाउंटमधील शिल्ल्क फक्त 50 वेळाच चेक करू शकाल. याआधी UPI वरून बँक अकाउंटमधील शिल्लक तपासायला कोणतीही मर्यादा नव्हती, पण आता वारंवार बॅलन्स चेक करण्याची सवय तुम्हाला बदलावी लागणार आहे. हा बदल विशेषतः अशा वापरकर्त्यांना लक्षात घेऊन करण्यात आला आहे जे वेळोवेळी बॅलन्स चेक करतात.
2. फक्त निश्चित वेळेवर ऑटो पेमेंट
आता Auto Pay पेमेंट फक्त सकाळी 10 वाजण्यापूर्वी किंवा दुपारी 1 ते संध्याकाळी 5 दरम्यान प्रक्रिया केले जातील. म्हणजेच, तुम्ही नेटफ्लिक्स, SIP किंवा कोणतेही ॲप पेमेंट ऑटोवर सेट केले असेल, तर ते फक्त या वेळेतच कापले जातील.
3. ट्रान्सॅक्शन हिस्ट्रीवर मर्यादा
आता कोणत्याही एका UPI ॲपवरून दिवसातून फक्त 25 वेळा खाते तपशील किंवा व्यवहार इतिहास पाहता येतो. म्हणजे पेमेंट हिस्ट्री पुन्हा पुन्हा स्क्रोल करण्याच्या सवयीवर मर्यादा घातली गेली आहे.
4. पेमेंट स्थिती पाहण्याची मर्यादा
UPI पेमेंट केल्यानंतर तुम्ही आता दिवसातून फक्त तीन वेळा पेमेंट स्थिती तपासू शकाल आणि प्रत्येक वेळी 90 सेकंदांचे अंतर आवश्यक असेल. याचा उद्देश ॲपला वारंवार भेट देणे टाळण्याचा आहे.
5. पेमेंट रिव्हर्सल करण्याची मर्यादा
आजपासून तुम्ही महिन्यातून फक्त 10 वेळा चार्जबॅकची विनंती करू शकता तर, एकाच व्यक्ती किंवा व्यापाऱ्याकडून पैसे परत करण्याची मर्यादा फक्त पाच वेळा असेल. म्हणजे आता बनावट रिव्हर्सल विनंत्या देखील नियंत्रित केल्या जातील.