शालेय शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांचे शुक्रवारी सामूहिक रजा आंदोलन

८ ऑगस्टपासून बेमूदत आंदोलनाचा इशारा

नागपूर येथील शिक्षण अधिकाऱ्यांच्या अपमानास्पदरित्या झालेल्या अटकेचा निषेध करत अखिल महाराष्ट्र शिक्षण सेवा राजपत्रित अधिकारी संघाने शुक्रवारी (१ ऑगस्ट) सामूहिक रजा आंदोलन पुकारले आहे.

नागपूर विभागातील बोगस शालार्थ आयडी प्रकरणात काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची कोणतीही चौकशी न होता अपमानास्पदरीत्या झालेल्या अटकेचा निषेध करत अखिल महाराष्ट्र शिक्षण सेवा राजपत्रित अधिकारी संघाने शुक्रवारी (१ ऑगस्ट) सामूहिक रजा आंदोलन पुकारले आहे. तसेच संघटनेने केलेल्या मागण्यांबाबत शासनाने लेखी आश्वासन न दिल्यास ८ ऑगस्टपासून बेमूदत आंदोलनाचाही इशारा देण्यात आला आहे.

अखिल महाराष्ट्र शिक्षण सेवा राजपत्रित अधिकारी संघाने या बाबतचे निवेदन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शालेय शिक्षणमंत्री, प्रधान सचिव, शिक्षण आयुक्तांना पाठवले आहे. नागपूर विभागातील बोगस शालार्थ आयडी प्रकरणात चोर सोडून संन्याशाला फाशी या म्हणीप्रमाणे तपास यंत्रणा काम करत आहेत. प्रामाणिकपणे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना कायद्याने दिलेले संरक्षण नाकारून विनाचौकशी अटक झाल्याने शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांमध्ये दहशत आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांचे कुटुंबीयही समाजात अपमानास्पद जीवन जगत आहेत. महाराष्ट्र शिक्षण सेवेतील अधिकारी हे राजपत्रित अधिकारी असून ते महाराष्ट्र शासनाचे काम नियमानुसार आणि प्रामाणिकपणे करत असतात. ते गुन्हेगार नसून काम करताना काही चुका, त्रुटी होऊ शकतात. त्यासाठी विभागाअंतर्गत चौकशीची आणि कारवाईची व्यवस्था अस्तित्वात व कार्यान्वित आहे. अधिकाऱ्यांच्या कामात अनियमितता आढळल्यास महाराष्ट्र नागरी सेवा नियमाप्रमाणे शास्तीची तरतूद आहे. तथापि, छोट्या छोट्या प्रशासकीय कारणांवरून शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांचे शासनाची परवानगी न घेता विना चौकशी अमानवीय पद्धतीने अटकसत्र सुरू आहे, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

या बाबीचा निषेध निवेदनात करण्यात आला आहे. शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना विभागाच्या परवानगीशिवाय विनाचौकशी अटकेपासून संरक्षणाची लेखी हमी शासनाकडून मिळत नाही. त्यामुळे राज्यातील शिक्षण सेवेतील सर्व अधिकारी शुक्रवारी सामूहिक रजा आंदोलन करत आहेत. एसआयटी चौकशी पूर्ण होईपर्यंत शिक्षक-शिक्षकेतर वेतन देयकावर शिक्षणाधिकारी प्रतिस्वाक्षरी करणार नाहीत, अतिरिक्त दूरदृश्यप्रणाली बैठका आणि सुटीच्या दिवशी अतिरिक्त कामाचा ताण कमी करावा, या मागण्यांवरही लेखी आश्वासन मिळाले नाही, तर न्याय्य मागण्यांसाठी संविधानिक मार्गाने ८ ऑगस्टपासून बेमूदत रजा आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.

निवेदनावर अध्यक्ष शेषराव बडे, कार्याध्यक्ष रवींद्र वाणी, सरचिटणीस सरोज जगताप, ज्योती परिहार, समरजित पाटील यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. राज्यभरातील शिक्षण विभागातील अधिकारी पुणे येथे शुक्रवारी जमा होत आहेत. तेथे शिक्षण आयुक्तांशी समक्ष भेटून चर्चा करण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक जिल्हा मुख्यालय येथे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात येणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button