
लोकांना डिजिटल अरेस्ट करणारी टोळीच.झाली अरेस्ट. रायगड पोलीसांच्या सायबर शाखेकडून ११ जणांना अटक!
अलिबाग : डिजिटल अरेस्टची भिती दाखवून लोकांना लुबाडणाऱ्या टोळीचा रायगड पोलीसांच्या सायबर शाखेनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी आत्ता पर्यंत ११ जणांना जेरबंद करण्यात आले आहे. यात जिओ कंपनीतील दोन वितरण व्यवस्थापकांचाही समावेश असल्याची माहिती रायगडच्या पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांनी दिली. रायगड जिल्ह्यात दाखल झालेल्या डिजिटल अरेस्ट गुन्ह्याची उकल करण्यात पोलीसांना यश आले आहे. या प्रकरणातील आरोपींच्या पुढील तपासासाठी अमंलबजावणी संचलनालय अर्थात ईडीची मदत घेतली जाणार आहे.
२३ मे रोजी अलिबाग येथील सायबर शाखेत डिजीटल अरेस्ट संदर्भात एक तक्रार प्राप्त झाली होती. ज्यात एका वयस्कर व्यक्तीकडून ६६ लाख रुपयांची रक्कम लुबाडण्यात आली होती. मुंबई सायबर शाखेत मनी लॉण्ड्रींग प्रकरणात तक्रारदारांवर गुन्हा दाखल झाला असून, अटक वॉरंट जारी झाले आहे. अटक टाळायची असेल तर पैसे द्यावे लागतील असे सांगून तक्रारदाराला वेगवेगळ्या खात्यात ६६ लाख रुपये जमा करण्यास भाग पाडले होते. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच वयस्कर व्यक्तीने अलिबागच्या पोलीसांकडे धाव घेत सायबर फसवणूकीबाबत तक्रार नोंदवली
जिल्ह्यात डिजिटल अरेस्ट फसवणूकीचे ही पहीलीच तक्रार होती. त्यामुळे पोलीस अधीक्षक आँचल दलाल आणि अप्पर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे यांनी सायबर शाखेला या गुन्ह्याचा सखोल आणि कौशल्य पूर्ण तपास करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार सायबर शाखेच्या पोलीस निरीक्षक रिजवाना नदाफ, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल जाधव आणि उपनिरीक्षक अजय मोहिते यांच्या पथकांनी गुन्ह्याचा तपास सुरू केला दीड महिना या प्रकरणाचा तपास सुरू होता.
तांत्रिक कौशल्य पणाला लाऊन पोलीसांनी राजस्थान, उत्तरप्रदेश, आसाम, तेलंगणा येथून एका पाठोपाठ एक असे एकूण ११ जणांना जेरबंद करण्यात आले. ज्यामध्ये बनावट कागदपत्र तयार करणारे, टेलिकॉम सर्व्हीस प्रोव्हाईडर कंपनीचे कर्मचारी, आणि काही सेशन इंटीमेशन प्रोटोकॉल अर्थार एसआपी कॉलिंग सर्व्हीस पुरवण्यासाठी एग्रिगेटर म्हणून काम करणाऱ्या व्यक्तींचा समावेश आहे.
आरोपींकडून ३५ मोबाईल, १ आयपॅड, ३ लॅप टॉप, १ व्हिपीएन पोर्ट आणि तब्बल ६ हजार १७५ मोबाईल सिम कार्ड जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणात ११२ बँक खाती पोलीसांनी गोठवली आहेत. ८५ लाख रुपयांची बिटकॉईन्स जप्त केली आहेत. महत्वाची बाब म्हणजे या गुन्ह्यातील दोन आरोपी हे अतिशय उच्च शिक्षीत असल्याचे तपासात समोर आले आहे. अभय संतप्रकाश मिश्रा हा बिटेक कॉम्प्युटर सायन्स मधील पदवी घेतली आहे. तर शम्स ताहीर खान हा एमबीएची पदवीधारक आहे.
अटक केलेल्या आरोपीची नावे
अब्दुस सलाम बारभुवन वय २९ रा. आसाम, बिलाल फैज अहमद वय ३२ रा उत्तरप्रदेश, नदीम महम्मद अस्लम महम्मद वय ३० रा. उत्तरप्रदेश, लारैब महोम्मद रफिक खान वय २४ रा उत्तरप्रदेश, शादान रेयाज अहमद खान वय २८ उत्तरप्रदेश, मोहम्मद फैसल सेराजुद्दीन खआन वय ३० रा. उत्तरप्रदेश, बलमोरी विनयकुमार राव वय ३३ हैद्राबाद, जिओ कंपनीत सेल्स मॅनेजर, गंगाधर गंगाराम मुट्टन वय ३४ रा. हैद्राबाद, जिओ कंपनीत सेल्स मॅनेजर, अभय संत प्रकाश मिश्रा, वय २९ रा उत्तरप्रदेश, मोहसिन मिया खांन वय ३५ रा. उत्तर प्रदेश, शम्स ताहीर खान वय ३० रा. राजस्थान या ११ जणांना अटक करण्यात आली आहे.
फसवणूक कशी व्हायची
बनावट कंपन्या स्थापन करून सिप लिझ लाईन्स आरोपीकडून घेतल्या जात होत्या, या लिझ लाईनच्या माध्यमातून वेगवेगळ्या लोकांना फेक कॉल करून, नंतर अटकेची धमकी देऊन त्यांची आर्थिक लुबाडणूक करत होते. यातील अभय मिश्रा नावाचा आरोपी असे पाच सर्व्हर चालवत होता. ज्यातील एका सर्व्हरच्या माध्यमातून एका महिन्यात ६१ लाख कॉल्स करण्यात आले होते. ज्यातील ३० टक्के लोकांनी फोन रिसिव्ह केले होते. ज्यामधील ९० हजार कॉल्स हे महाराष्ट्रातील लोकांना करण्यात आले होते. त्यामुळे असे डिजीटल अरेस्टचे फोन कॉल्स करून धमकावले जात असेल तर तातडीने जवळच्या पोलीस ठाण्यात तशा तक्रारी करण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांनी केले.