
रत्नागिरी तालुक्यातील खेडशी डफळचोळवाडी (वरची वाडी) येथे जाळीत अडकलेला बिबट्या तुरी देऊन पळाला
रत्नागिरी तालुक्यातील खेडशी डफळचोळवाडी (वरची वाडी) येथे जाळीत अडकलेला बिबट्या वनविभागाच्या पथकाला तुरी देऊन पळाल्याची घटना घडली आहे
रत्नागिरी तालुक्यातील खेडशी डफळचोळवाडी (वरची वाडी) येथे गेल्या काही दिवसांपासून परिसरात कुत्रे आणि कोंबड्यावर हल्ला करत ग्रामस्थांच्या काळजाचा ठोका चुकवणाऱ्या बिबट्याने बुधवारी रात्री पुन्हा एकदा आपली दहशत पसरवली. कल्पेश देवरुखकर यांच्या शेतातील भाजीपाल्याच्या जाळीत लपून बसलेल्या बिबट्यामुळे संपूर्ण वाडीमध्ये एकच खळबळ उडाली.
रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. ग्रामस्थांनी बिबट्याचा आवाज ऐकून व हालचाल पाहताच तत्काळ वनविभागाला कळवले. केवळ अर्ध्या तासात वन विभागाच्या शर्वरी कदम घटनास्थळी दाखल झाल्या. मात्र पिंजरा तुरळ येथे असल्याने रेस्क्यू ऑपरेशन तात्काळ सुरू करता आले नाही. त्यानंतर तातडीने सापळा रचण्यात आला. भाजीच्या जाळीत अडकलेला बिबट्या काहीकाळ पर्यंत तिथेच थांबला. मात्र, रेस्क्यू ऑपरेशन सुरू करताच संधी साधत बिबट्याने ताकदीने जोर लावून झपाट्याने पळ काढला. त्यामुळे बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाचे रेस्क्यू ऑपरेशन अपयशी ठरले.
या घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरली आणि मध्यरात्री आजूबाजूच्या वाड्यांमधून ग्रामस्थांनी घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली. बिबट्याला प्रत्यक्ष पाहण्याच्या उत्सुकतेपोटी अनेकांनी थेट घटनास्थळी धाव घेतली.