रत्नागिरीमध्ये ६ ते १२ ऑगस्ट या कालावधीत संस्कृत सप्ताह : संस्कृतभारतीचे आयोजन

प्रतिवर्षी श्रावण पौर्णिमेला संस्कृत दिन साजरा केला जातो. यावर्षी संस्कृत दिनाचे औचित्य साधून ६ ऑगस्ट ते १२ ऑगस्ट २०२५ या कालावधीत रत्नागिरी येथे संस्कृत सप्ताहाचे आयोजन करण्यात येत आहे. संस्कृतभारती रत्नागिरी येथील विविध संस्थांच्या साहाय्याने रत्नागिरी नगरात विविध उपक्रम आयोजित करत आहे.

यामध्ये पुढील कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत-
०६/०८/२०२५
दि. ६ ऑगस्ट रोजी रत्नागिरी नगरातील व आजूबाजूच्या गावातील ३५ विद्यालयांमध्ये १ली ते १०वीच्या विद्यार्थ्यांसाठी सामूहिक सुभाषित पठण अभियान आयोजित केले आहे. यामध्ये सर्व शाळांमधील विद्यार्थी १० सुभाषितांचे सामूहिक पठण करणार आहेत.

०७/०८/२०२५
दि. ७ ऑगस्ट रोजी कविकुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालय – भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्रासह प्रश्नमंजूषा आणि संस्कृत दिनाचा कार्यक्रम भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्रात सायंकाळी ४ वाजता आयोजित केला आहे.

०८/०८/२०२५
दि. ८ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता राणी लक्ष्मीबाई सभागृह, शेरे नाका येथे ‘स्तोत्रकाव्यांजली’ हा कार्यक्रम स्वानंद पठण मंडळासह आयोजित केला आहे.

०९/०८/२०२५
दि. ९ ऑगस्ट रोजी म्हणजे संस्कृत दिनाच्या दिवशी रत्नागिरी सायकलिस्ट क्लब यांच्या संस्कृत बोधवाक्याचे अनावरण व त्यानिमित्ताने संस्कृत प्रचाराचा कार्यक्रम होणार आहे.

१०/०८/२०२५
दि. १० ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता संस्कृतभारतीचे प्रांतमंत्री श्री. नीरज वामन दांडेकर यांचे ऑनलाईन व्याख्यान होईल. त्याच दिवशी सकाळी दहा वाजल्यापासून भारतीय संस्कृती ज्ञान परीक्षा ऑनलाईन माध्यमातून घेण्यात येणार आहे. भारतीय संस्कृती व संस्कृत भाषेविषयी ही परीक्षा असणार आहे. सर्व सहभागींना ई-प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

११/०८/२०२५
दि. ११ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता गोगटे जोगळेकर महाविद्यालयात संस्कृत विभागासह संस्कृत दिनाचा कार्यक्रम होईल.

१२/०८/२०२५
दि. १२ ऑगस्ट रोजी भारतीय ज्ञान परंपरेतील प्रसिद्ध असा ‘अष्टावधानकला’ हा कार्यक्रम होणार आहे. यामध्ये बंगलोर येथील अष्टावधानी विद्वान डॉ. उमामहेश्वर ना. हे ‘अष्टावधानकला’ सादर करणार आहेत. यामध्ये गोवा व मुंबई येथील विविध विद्वान व्यक्ती सहभागी होणार आहेत. हा कार्यक्रम १२ ऑगस्ट रोजी झाडगाव येथील माधवराव मुळ्ये भवनातील वैद्य सभागृहात सायंकाळी ४ ते ७ या वेळेत आयोजित करण्यात आला आहे.

अशा विविधांगी कार्यक्रमांमध्ये सर्व संस्कृत प्रेमींनी आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन संस्कृतभारतीच्या वतीने करण्यात आले आहे.

  • संस्कृतभारती
    दक्षिण रत्नागिरी जिल्हा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button