
महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना; माथेफिरूकडून कोयत्याने तोडफोड करण्याचा प्रयत्न
पुणे रेल्वे स्थानकाबाहेर असलेल्या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची एका माथेफिरूने विटंबना केली. त्याने पुतळ्यावर कोयता मारून तोडफोड करण्याचा प्रयत्न झाला आहे. रविवारी (दि.6) रात्री पावणेअकराच्या सुमारास हा प्रकार घडला.
याप्रकरणी माथेफिरू सूरज शुक्ला (वय 35, रा. विश्रांतवाडी; मूळ रा. वाराणसी, उत्तर प्रदेश) याला बंडगार्डन पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात असून, आरोपीच्या कृत्याचे विविध सामाजिक संघटना, राजकीय पदाधिकारी यांनी निषेध नोंदविला आहे, तर पुणे काँग्रेसच्या वतीने महात्मा गांधींच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करण्यात आला.आरोपी शुक्ला हा खासगी नोकरदार आहे. रविवारी रात्री पावणेअकराच्या सुमारास तो रेल्वे स्थानकाच्या परिसरात कोयता घेऊन आला होता. त्या वेळी पुणे रेल्वे स्टेशन परिसरात अनेक प्रवासी होते.
माथेफिरू शुक्ला हा महात्मा गांधींचा पुतळा असलेल्या चौथर्याजवळ गेला. त्याने पुतळ्यावर कोयता मारून पुतळ्याची तोडफोड करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी नागरिकांनी तातडीने रेल्वे पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी आरोपी सूरज शुक्ला याला चौथर्यावरून उतरवून ताब्यात घेतले.