
नाणीज ग्रामपंचायतीत बँक ऑफ इंडियाच्यावतीने ‘आर्थिक समावेशन’ आणि ‘ई-केवायसी’ शिबिराचे यशस्वी आयोजन
रत्नागिरी, दि. ३१ – बँक ऑफ इंडियाच्या पाली शाखेने नाणीज ग्रामपंचायतीत ‘आर्थिक समावेशन योजना’ आणि ‘ई-केवायसी’ शिबिराचे यशस्वीरित्या आयोजन केले. या शिबिराचे उद्घाटन बँक ऑफ इंडियाचे झोनल मॅनेजर नरेंद्र रघुनाथ देवरे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी बोलताना श्री. देवरे यांनी प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (PMJJBY), प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (PMSBY), अटल पेन्शन योजना (APY) आणि प्रधानमंत्री जनधन योजना (PMJDY) यांसारख्या विविध सरकारी योजनांचे महत्त्व विशद केले. नागरिकांनी बँकेच्या योजनांचा लाभ घेऊन आपले आर्थिक भवितव्य सुरक्षित करावे, असे आवाहन त्यांनी केले. त्यांनी आपल्या खात्याच्या ई-केवायसीसाठी क्यूआर कोड, एसएमएस, बँक मित्र चॅनेलद्वारे बँक ऑफ इंडियाच्या शाखेशी संपर्क साधण्याचे आवाहन केले, जेणेकरून कोणत्याही प्रकारची गैरसोय टाळता येईल. सदर आर्थिक समावेशन आणि ई-केवायसी शिबिरे दि. १ जुलै ते 30 सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या शिबिराला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे एल.डी.ओ. विजय कोरडे यांनीही उपस्थिती लावली. त्यांनी ई-केवायसीचे महत्त्व समजावून सांगितले आणि वित्तीय योजनांवरील तसेच फसवणूक प्रतिबंधावरील जागृतीपर व्हिडिओ दाखवले. अग्रणी जिल्हा व्यवस्थापक दर्शन कानसे यांनी तीन महिन्यांच्या आर्थिक समावेशन योजना मोहिमेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. ग्रामस्थांना आर्थिक समावेशनापासून वंचित न राहण्याचे आवाहन केले आणि या मोहिमेत ग्रामपंचायतीने पूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन केले.
यावेळी वित्तीय सेवा विभाग, वित्त मंत्रालय, भारत सरकार यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार विविध सर्व उपक्रम राबवण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना आणि अटल पेन्शन योजनांमध्ये नोंदणी व ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे.
ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, बँक कर्मचारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या शिबिरात नागरिकांना बँकिंग सेवांशी संबंधित माहिती मिळाली आणि त्यांना विविध सरकारी योजनांचा लाभ घेण्याची संधी मिळाली. बँक ऑफ इंडियाचे योगेश कडू, पाली शाखा व्यवस्थापक यांनी ग्रामस्थांना सर्व आर्थिक समावेशन योजनेअंतर्गत नोंदणी व ई-केवायसीसाठी बँक ऑफ इंडियाच्या शाखेशी संपर्क साधण्याचे आवाहन केले.