
डोनाल्ड ट्रम्प यांनी १० ते ४१ % पर्यंत कर लावण्याच्या आदेशावर केली स्वाक्षरी ; भारतासह ७० देशांना मोठा फटका
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक मोठा निर्णय घेत जगातील डझनभर देशांवर १०% ते ४१% पर्यंतचे नवीन परस्पर कर लादण्याचा आदेश जारी केला. या आदेशावर स्वाक्षरी करताना ट्रम्प यांनी, ‘वर्षानुवर्षे सुरू असलेला व्यापार असमतोल दूर करण्यासाठी आणि अमेरिकेची आर्थिक सुरक्षा मजबूत करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे’ असे म्हटले आहे.व्हाईट हाऊसने जारी केलेल्या निवेदनानुसार, या आदेशामुळे केवळ शुल्क दरांमध्ये बदल होणार नाही, तर या शुल्कांच्या अंमलबजावणीची तारीख देखील निश्चित केली जणार आहे. ट्रम्प यांनी सुरुवातीला शुल्कासाठी १ ऑगस्ट ही तारीख निश्चित केली होती, जेणेकरून सर्व देशांसोबत व्यापार करार तोपर्यंत पूर्ण करता येतील, परंतु आता ज्या ७० हून अधिक देशांवर शुल्क लागू असेल त्यांच्यासाठी हे शुल्क आदेश जारी झाल्यानंतर ७ दिवसांनी लागू होतील. जर ७ ऑगस्टपर्यंत जहाजावर कोणताही माल लोड केला गेला असेल आणि तो ५ ऑक्टोबरपर्यंत अमेरिकेत पोहोचला असेल, तर त्यावर नवीन कर लागू होणार नाही, तसेच जर तो आधीच वाहतुकीत असेल तर हा कर लागू होणार नसल्याचेही यात म्हटले आहे.
या आदेशानुसार, भारतावर २५% कर लादण्यात आला आहे. अमेरिकेकडून “भारतासारखे देश अमेरिकन वस्तूंवर जास्त शुल्क लादतात, तर स्वतःसाठी व्यापार सवलतींची मागणी करतात” असा दावा करण्यात आला आहे. तर दुसरीकडे पाकिस्तानवर १९%, बांगलादेश आणि व्हिएतनामवर २०%, दक्षिण आफ्रिकेवर ३०% आणि स्वित्झर्लंडवर सर्वाधिक ३९% शुल्क लादण्यात आले आहे. याशिवाय, कॅमेरून, चाड, इस्रायल, तुर्की, व्हेनेझुएला आणि लेसोथो सारख्या देशांवर १५% शुल्क लादण्यात आले आहे.