
अखेर माणिकराव कोकाटेंची उचलबांगडी; अजित पवारांच्या विश्वासू शिलेदाराकडे कृषीमंत्रिपद
विधान भवनात रम्मीचा ऑनलाइन डाव खेळताना दिसलेले कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना अखेर त्यांच्या कृतीची मोठी किंमत मोजावी लागली आहे. पावसाळी अधिवेशनादरम्यान त्यांचा हा ‘खेळ’ चांगलाच चर्चेत आला होता.राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नेते रोहित पवार यांनी कोकाटे यांचा रम्मी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल केल्यानंतर विरोधकांनी त्यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले.
शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढत असताना आणि कृषी खात्यावर गंभीर प्रश्न असताना कोकाटे यांचा हा बेजबाबदारपणा जनतेला आणि विरोधकांना खटकला. यामुळे निर्माण झालेल्या तीव्र संतापानंतर अखेर माणिकराव कोकाटे यांच्याकडून कृषिमंत्रिपद काढून घेण्यात आले आहे.
या निर्णयानुसार, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विश्वासू सहकारी दत्तात्रय भरणे यांच्याकडे आता कृषी खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. दुसरीकडे, भरणे यांच्याकडे असलेले क्रीडा आणि युवक कल्याण खाते माणिकराव कोकाटे यांना देण्यात आले आहे.