
वकील असल्याचे भासवून शेतकर्याची फसवणूक, नाखरे येथील इसमाविरूद्ध गुन्हा दाखल.
वकील असल्याचा बनाव करून एका शेतकर्याची ४५,११० रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी जीवन गणपत जाधव (५५, रा. तानाखरे, रत्नागिरी) याला लांजा पोलिसांनी सोमवार दि. २८ जुलै रात्री अटक केली. आसगे येथील शेतकरी बाबाजी बुधाजी कोलापटे (६२) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली होती. दि. २३ जून ते १७ जुलै या कालावधीत आरोपीने आपण वकील असल्याचे भासवून फिर्यादीचा विश्वास संपादन केला. त्यानंतर फिर्यादीची कार भाड्याने घेतली व त्याचे भाडे ३७,००० रुपये न देता थकवले. तसेच जेल कॅन्टीनमध्ये काम मिळवून देण्याचे आमिष दाखवत त्यांच्याकडून सॅमसंग कंपनीचा ५ हजार रुपये किंमतीचा मोबाईल उचलला. इतकेच नव्हे तर नातीच्या शांतीच्या कारणावरून १,११० रुपये किंमतीचे ३७ नारळही घेतले. शेतकर्याला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी लांजा पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यानुसार पोलिसांनी भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ अंतर्गत कलम ३१६ (२) व ३१९ (१) नुसार गुन्हा दाखल करून आरोपीला ताब्यात घेतले. या प्रकणाचा पुढील तपास लांजा पोलीस करीत आहेत.www.konkantoday.com