
रत्नागिरी शहरात पुन्हा एकदा मोकाट गुरांचा वावर, रामनाक्यावर गुरांचे रस्तारोको
रत्नागिरी शहरात काही दिवसांपूर्वी जागोजागी मोकाट गुरांचा वावर मोठ्या प्रमाणावर वाढला होता. पावसाळ्यात व काळोखात ही मोकाट गुरे दिसत नसल्याने तसेच दिवसाही रस्त्याच्या मधोमध ही गुरे बसत असल्याने अपघात होण्याची शक्यता होती. यामुळे या विरोधात राजकीय पक्षानी आवाज उठवून रत्नागिरी नगर परिषदेला मोकाट गुरांवर कारवाई करावी अशी मागणी केली होती. त्याप्रमाणे रत्नागिरी नगर परिषदेच्या प्रशासनाने याची दखल घेवून तातडीने मोकाट गुरांवर कारवाई केली होती.
या मोकाट गुरांना चंपक मैदान येथे उभारण्यात आलेल्या कोंडवाड्यात ठेवण्यात आले. मात्र या गुरांचे मालक ही गुरे नेण्यास फिरकलेच नाहीत. त्यामुळे या गुरांच्या खाण्यापिण्याचा खर्च रत्नागिरी नगर परिषदेवर पडला आहे. असे असताना आता रत्नागिरी शहरात परत एकदा मोकाट गुरांचा वावर सुरु झाला आहे. रत्नागिरी शहरातील रामनाक्यावर अहोरात्र मोकाट गुरांच्या कळपांनी ठिय्या मांडून रामआळी नाक्यावर जाणारा रस्ता बंद केला होता.

त्यामुळे या मोकाट गुरांवर पुन्हा एकदा तातडीने कारवाई करण्यात यावी अशी नागरिकांनी मागणी केली आहे तसेच संबंधित मालकांनाही दंड करण्यात यावा, अशीही मागणी होत आहे. www.konkantoday.com