
तळागाळातील शिवसेनेचा खरा कार्यकर्ता आजही उद्धव ठाकरेंशी निष्ठावान, उबाठा उपनेते बाळ माने
तळागाळातील शिवसेनेचा खरा कार्यकर्ता आजही उद्धव ठाकरेंशी निष्ठावान आहे. त्यांना ना पैशाची अपेक्षा, ना सत्तेची हाच फक्त पाठीवर शाबासकीची थाप हवी आहे, असे भावनिक उदगार शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपनेते बाळ माने यांनी व्यक्त केले. पक्षातील गद्दार निघून गेले आहेत. त्यामुळे येत्या शंभर दिवसात होवू घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी आतापासूनच तयारीला लागा, असे स्पष्ट आवाहनही त्यांनी यावेळी केले.रत्नागिरी येथील जयेश मंगल पार्क येथे पार पडलेल्या शिवबंधन परिक्रमा पूर्वतयारी बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाप्रमुख दत्ताजी कदम, संपर्कप्रमुख सहदेव बेटकर, युवा जिल्हाप्रमुख रवी डोळस, तालुकाप्रमुख, शहरप्रमुख आणि विविध पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवबंधन परिक्रमा ही पक्षाच्या संघटनात्मक बांधणीसाठी राबवण्यात येणारी महत्वाकांक्षी योजना असून, यामुळे निष्ठावान शिवसैनिकांपर्यंत थेट संवाद साधण्याची संधी मिळणार आहे. परिक्रमा पूर्ण झाल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा जिल्हा दौरा आयोजित केला जाणार असून त्याआधी तालुकास्तरावर बैठकीचे आयोजन करण्यात येणार आहे. उद्धव ठाकरे यांच्या दौर्यामुळे शिवसैनिकांचा उत्साह अधिक वाढेल आणि पक्षाला एक नवीन दिशा मिळेल, अशी अपेक्षा आहे.यावेळी माने म्हणाले की, भक्त प्रल्हादावर जशी संकटाची मालिका आली, तशीच परिस्थिती विरोधकांनी उद्धव ठाकरेंवर आणायचा प्रयत्न केला. मात्र सच्चा कार्यकर्त्यांच्या जीवावर त्यांनी तीही आव्हानं पार केली. जिल्हाप्रमुख दत्ताजी कदम आणि संपर्कप्रमुख महादेव बेटकर यांनीही कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत संघटन मजबूत करण्याचे आवाहन केले.www.konkantoday.com