
चिपळूणच्या वाढीव उड्डाणपुलासाठी मंत्र्यांना साकडे
चिपळूणशहरातून जाणाऱ्या मुंबई गोवा महामार्गावरील उड्डाणपूल कापसाळपर्यंत वाढवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या उपस्थितीत आमदार शेखर निकम व महायुती शिष्टमंडळाची मंत्रालयात बैठक झाली.या बैठकीत कापसाळपर्यंत होणाऱ्या उड्डाणपुलाच्या कामाचे अंदाजपत्रक तयार करण्याच्या सूचना मंत्री भोसले यांनी दिल्या. तसेच चिपळुणात भेट देऊन महामार्गाची पाहणी करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
मुंबई-गोवा महामार्गावरील उड्डाणपूल कापसाळपर्यंत होण्यासाठी हे शिष्टमंडळ पाठपुरावा करत आहे. आमदार निकम यांच्या पुढाकारामुळे मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या मंत्रालयातील दालनात शिष्टमंडळाची बैठक झाली. बैठकीत कापसाळपर्यंत उड्डाणपुलाची आवश्यकता सविस्तरपणे मांडण्यात आली.
त्यावर मंत्र्यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांना तत्काळ वाढीव उड्डाणपुलाच्या कामाचे अंदाजपत्रक तयार करण्याच्या सूचना दिल्या. शिवाय मुख्य अभियंत्यांनाही येथे पाहणी करण्याची सूचना केली. येत्या काही दिवसांत चिपळूणला भेट देत स्वतः महामार्गाची पाहणी करण्याचे आश्वासन मंत्र्यांनी दिले.