
कोकण रेल्वेतून कार, खिशाला भार! बोटीने जा अथवा रेल्वे मार्गाने कोकणासाठी रो रो सेवा महागच!!
अलिबाग : गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्यासाठी रो रो सेवेचा विचार करत असाल, तरी ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. यंदा कोकणात जाण्यासाठी रेल्वे आणि बोट असे दोन रो रो सेवेचे पर्याय कोकणवासियांसाठी उपलब्ध असणार आहे. मात्र दोन्ही पर्याय वापर करण्यासाठी प्रवाश्यांना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे.
यंदा कोकण रेल्वेने आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रोल ऑन रोल ऑफ सेवेची घोषणा केली आहे. ज्यातून प्रवाश्यांना त्यांची चार चाकी गाड्या रेल्वेतून थेट गोव्यापर्यंत नेण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. रायगड जिल्ह्यातील कोलाड ते गोव्यातील वेरणा दरम्यान चालवली जाणार आहे. ज्यासाठी आरक्षण सुविधा सुरू करण्यात आली आहे. २३ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर या कालावधीत ही विशेष रो रो सेवा गाडी चालवली जाणार आहे.
मात्र यासाठी प्रवाश्यांना मोठा आर्थिक भूर्दंड सोसावा लागणार आहे. एका वेळेस चाळीस गाड्याच या रेल्वेनी नेल्या जाणार असून, प्रत्येक गाडीसाठी ७ हजार ८७५ रुपयांचे भाडे आकारले जाणार आहे. या शिवाय गाडी सोबत तीन प्रवाश्यांना प्रवास करता येणार असून त्यांना अतिरिक्त प्रवास भाडे द्यावे लागणार आहे. तीन पैकी दोन प्रवाश्यांना वातानुकूलीत थर्ड एसी डब्यातून, तर तिसऱ्या प्रवाश्याला द्वितीय श्रेणी डब्यातून प्रवास करावा लागणार आहे. वातानुकूलीत डब्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांसाठी ९३५ रुपये तर व्दितीय श्रेणी डब्यातून प्रवास करणाऱ्या तिसऱ्या प्रवाश्यासाठी १९० रुपये तिकीट आकारले जाणार आहे. त्यामुळे तीन जणांना गाडीसह प्रवासाठी जवळपास दहा हजार खर्च करावा लागणार आहे.
या मुंबईतून कोलाड पर्यंत, आणि वेरणाहून सिंधुदुर्गात आपल्या गावी जाण्यासाठी दोन्ही बाजूने शंभर किलोमीटरचे अंतर पार गाडीने पार करावे लागणार आहे. ज्यासाठी अतिरीक्त प्रवास खर्च वाहनचालकांना सोसावा लागणार आहे. त्यामुळे या रो रो सेवेचा लाभ घेणे ही एक खर्चिक बाब ठरणार आहे.
या शिवाय कोलाड ते वेरणा दरम्यानच्या प्रवासासाठी १२ तासांचा कालावधी लागणार आहे. या प्रवासासाठी प्रवाश्यांना वाहन घेऊन किमान तीन तास आधी कोलाड येथे दाखल होणे अपेक्षित आहे. या शिवाय मुंबईतून कोलाड येथे पोहोचण्यासाठी अडीच ते तीन तासांचा प्रवास करावा लागणार आहे. त्यामुळे गोव्यातून तळ कोकणात येण्यसाठी पुन्हा तास दीड तासाचा प्रवास करावा लागणार आहे. त्यामुळे किमान २० तासांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.
रेल्वे प्रमाणेच सागरी मार्गातून रो रो सेवेचा पर्याय गणेशभक्तांना उपलब्ध असणार आहे. मुंबईतील भाऊचा धक्का येथून रायगड जिल्ह्यातील मांडव्यापर्यंत सागरी मार्गावर रो रो सेवा उपलब्ध असणार आहे. ज्यातून एका वेळेस जळपास दोनशे गाड्यांची वाहतूक केली जाणार आहे. या सेवेमुळे प्रवासाची वेळ वाचणार असली तरी प्रवाश्यांना जादा प्रवास खर्च द्यावा लागणार आहे. वाहनाच्या आकारानूसार भाडे आकारणी केली जाणार आहे. लहान चार चाकी वाहनाचे भाडे एका वेळच्यावेळच्या प्रवासाठी १ हजार २० पासून सुरु होणार आहे, तर बसचे भाडे ४ हजार ५०० पासून सुरु होणार आहे. या शिवाय प्रती प्रवासी ४२० पासून प्रवास भाडे आकरले जाणार आहे. पाळीव प्राण्यांना बोटीतून घेऊन जाण्यासाठी अतिरीक्त भाडे आकरणी होणार आहे. त्यामुळे रेल्वे असो अथवा सागरी मार्ग दोन्ही पर्यायांचा वापर करण्यासाठी गणेश भक्तांचा खिसा नक्की रिकामा करावा होणार आहे.