
उत्तराखंडमध्ये तुफान पाऊस! भूस्खलनामुळे केदारनाथ यात्रा पुन्हा थांबली; हजारो यात्रेकरू अडकले!
केदारनाथ यात्रा : उत्तराखंडमध्ये पडत असलेल्या तुफान पावसामुळे केदारनाथ यात्रा पुन्हा एकदा थांबली आहे. पावसामुळे नुकतेच केदारनाथ मार्गावर भूस्खलन झाले आहे. त्यामुळेच पुन्हा एकदा, सुरक्षेच्या कारणास्तव प्रशासनाने केदारनाथ यात्रा दोन दिवसांसाठी थांबवली आहे.
सोनप्रयाग आणि गौरीकुंड दरम्यान मुंकटिया येथे रस्त्याचे नुकसान झाल्यामुळे (30 जुलै) केदारनाथ महामार्ग विस्कळीत झाला होता. सुरक्षिततेच्या कारणास्तव जिल्हा प्रशासनाने केदारनाथ यात्रेवर दोन दिवस बंदी घातली. दरम्यान, केदारनाथमध्ये अडकलेल्या अडीच हजार यात्रेकरूंना सोनप्रयागला सुरक्षितपणे नेण्यात पोलिस, एसडीआरएफ आणि एनडीआरएफ व्यस्त होते.
सोनप्रयागमध्ये काल रात्री मुसळधार पाऊस पडला. यामुळे मुंकटियाजवळ भूस्खलन झाले आणि केदारनाथ महामार्गावरील सुमारे 50 मीटर रस्त्याचे नुकसान झाले. त्यामुळे या मार्गावरील वाहनांची वाहतूक थांबली. दुसरीकडे पर्यायी पदपथ खराब झाल्यामुळे केदारनाथहून येणारे 2500 भाविक गौरीकुंडमध्ये अडकले. प्रशासन-पोलिसांनी तातडीने मदतकार्य सुरु केले आहे.
केदारनाथहून सोनप्रयागला येणाऱ्या भाविकांना नेण्यासाठी एसडीआरएफ, एनडीआरएफ आणि पोलिस कर्मचारी तैनात केले. दुपारपर्यंत दीड हजार लोकांना सोनप्रयागला नेण्यात आले होते तर उर्वरित लोकांना बाहेर काढण्याचे काम संध्याकाळपर्यंत सुरू होते. डीएम प्रतीक जैन म्हणाले की, यात्रेकरूंची सुरक्षा ही सर्वोच्च प्राथमिकता आहे. एसपी अक्षय प्रल्हाद कोंडे म्हणाले की, पाऊस आणि भूस्खलनाची शक्यता लक्षात घेता, केदारनाथ यात्रा दोन दिवसांसाठी थांबवण्यात आली आहे.