
राज्य कुस्तीगीर परिषदेच्या विभागीय सचिवपदी सदानंद जोशी यांची निवड
रत्नागिरी:
राज्य कुस्तीगीर परिषदेच्या विभागीय सचिवपदी सदानंद जोशी यांची निवड झाली आहे. सदानंद जोशी यांची निवड होताच कुस्ती वर्तुळात आनंदाचे वातावरण आहे. सदानंद जोशी यांच्या निवडीमुळे कुस्ती खेळाच्या विकासाला अधिक गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
सदानंद जोशी हे ५० वर्षांपासून कुस्ती खेळाशी संबंधित असून, त्यांनी यापूर्वी विविध स्तरांवर कुस्तीच्या प्रचारासाठी आणि प्रसारासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांच्या अनुभवाचा आणि कार्याचा कुस्ती परिषदेला निश्चितच फायदा होईल, असे मत कुस्ती क्षेत्रातील दिग्गजांनी व्यक्त केले आहे.
“माझ्यावर टाकलेल्या या जबाबदारीबद्दल मी राज्य कुस्तीगीर परिषदेचा आभारी आहे असे मत सदानंद जोशी यांनी व्यक्त केले. कुस्ती खेळाला नवी दिशा देण्यासाठी आणि नवोदित मल्लांना प्रोत्साहन देण्यासाठी मी कटिबद्ध असेन. राज्यातील कुस्तीचा वारसा जपून तो अधिक समृद्ध करण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करेन,” असे जोशी यांनी सांगितले.
सदानंद जोशी यांचे कुस्तीशिवाय शरिरसौष्ठव, कबड्डी क्षेत्रातही मोठे योगदान आहे. त्यांच्या निवडीबद्दल रत्नागिरी जिल्हा कुस्ती असोसिएशन आणि जिल्ह्यातील क्रीडाप्रेमींकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात कुस्तीला नवी उंची गाठता येईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.