
रत्नागिरीतील ज्येष्ठ लेखिका, समाजसेविका सुलभाताई धामापूरकर यांचे निधन.
रत्नागिरीतील प्रसिद्ध लेखिका, सामाजिक कार्यकर्त्या आणि यशोदा प्रकाशनच्या सर्वेसर्वा सुलभाताई रमाकांत धामापूरकर यांचे शुक्रवारी सायंकाळी वयाच्या ७९ व्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.सुलभाताई या नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर असत. त्या कै. रमाकांत धामापूरकर यांच्या पत्नी होत. त्यांनी संमोहन तज्ज्ञ म्हणून ३३ वर्षे, तर लेखिका म्हणून ४० वर्षे काम केले. त्यांची अनेक पुस्तके त्याचबरोबर विविध विषयांवरील लेखही प्रकाशित झाले आहेत. त्यांनी आकाशवाणीवर संमोहन, स्त्री शक्ती यासह अनेक विषय प्रकर्षाने मांडले. त्यांची यशोदा प्रकाशन संस्था पंचवीस वर्षांहून अधिक काळ चांगल्या पद्धतीने काम करत आहे. संमोहन विषयांमध्ये त्यांनी अनेक व्याख्याने दिली. कोकण मराठी साहित्य परिषदेमध्ये त्या आजीवन सदस्य रहिल्या. सामाजिक बांधिलकी जपत अविष्कार मतिमंद शाळेचेही त्या आजीवन सदस्य होत्या. त्यांनी समाजामध्ये अनेकांना मदत केली आहे. त्या जिल्हास्तरीय अपारंपरिक ऊर्जा सहभाग प्रतिष्ठानच्या माजी उपाध्यक्ष होत्या. त्यांच्या पश्चात दोन मुले व मुलगी असा परिवार आहे.www.konkantoday.com