
सप्तलिंगी नदीत बुडणाऱ्या दोघांना जीवदान
देवरुख शहरातील सप्तलिंगी नदीपात्रात गणपती विसर्जन करण्यासाठी गेलेल्या दोन तरुणांना बुडत असताना वाचवण्यात आले. तरुणाच्या सहकाऱ्यांनी धाडसाने दोघांना वाचवले, ही घटना बुधवारी सायंकाळी उशिरा घडली. दोन्ही तरुणांची प्रकृती सध्या स्थिर आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शहर परिसरातील गणपतींचे मोठ्या प्रमाणात सप्तलिंगी नदीपात्राच्या मच्छी मार्केट परिसरामध्ये विसर्जन होत असते. विसर्जन केलेले गणपती झाडाझुडपांमध्ये कडेला अडकलेले असतात. हे गणपती दुसऱ्या दिवशी खालच्याआळी येथील तरुण एकत्र येऊन पुन्हा पाण्यात विसर्जन करण्याचे काम करतात.
बुधवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास खालची आळी येथील तरुण नदीपात्रात उतरून अडकलेले जाळीतील गणपती सोडवण्याचे काम करत होते. एवढ्यातच पाण्याचा मोठा लोंढा आल्यामुळे आशय बारटक्के हा तरुण पट्टीचा पोहणारा असतानाही पाण्यात बुडू लागला. ही बाब सुवारे या तरुणाच्या लक्षात येताच त्याने आशय बारटक्केला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र बारटक्के याने सुवारे याला मिठी मारल्यामुळे सुवारे देखील पाण्यात बुडू लागला.
हे लक्षात येताच तात्काळ सहकाऱ्यांनी दोघांनाही पाण्याबाहेर काढले. यामुळे दोघांचेही प्राण वाचले आहेत.




