
कोकणात बंदी काळात अवैध मासेमारी रोखण्यात यंत्रणांना अपयश,?
खांदेरी बोट दुर्घटनेमुळे, बंदी काळात अवैध मासेमारीचा प्रश्न चव्हाट्यावर
_____*
खांदेरी येथे झालेल्या बोट दुर्घटनेत तीन मच्छीमारांचा मृत्यू झाला, या दुर्घटनेत पाच जण थोडक्यात बचावले. मात्र या दुर्घटनेमुळे पावसाळ्यात बंदी असूनही सुरु असेलेली मासेमारी आणि त्याकडे होणारे यंत्रणांचे दुर्लक्ष या दोन बाबी समोर आल्या आहेत. बंदी काळात होणाऱ्या अवैध मासेमारीमारी रोखण्यात यंत्रणा अपयशी ठरत असल्याचेही उजागर झाले आहे.
कोकण किनारपट्टीवर १ जून ते ३१ जुलै या कालावधील मासेमारीवर बंदी घातली जाते. पावसाळ्यात समुद्राला मोठी उधाणे येतात, वादळी वारेही वाहत असतात, त्यामुळे मच्छीमारांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही बंदी घातली जाते. त्याच बरोबर हा कालावधी माश्यांच्या प्रजननाचा कालावधी असतो त्यामुळे मासेमारीवर निर्बंध घातले जातात. मात्र बंदी कालावधीतही काही मासेमारी बोटी बेकायदेशीरपणे मासेमारी करतात. खांदेरी येथील दुर्घटनेनंतर ही बाब प्रकर्षाने समोर आली आहे.
बंदी कालावधीत यांत्रिक पध्दतीने मासेमारी निर्बंध घातले जातात. त्याबाबतच्या सुचना स्थानिक मच्छीमार संख्या आणि बोट मालकांना दिल्या जातात. पोलीस आणि मत्स्यव्यवसाय विभागाकडून मासेमारी बंद ठेवण्याचे आवाहन केले जात असते. मात्र शासनआदेश डावलून काही मच्छीमार मासेमारी बंदीच्या काळात छुप्या पध्दतीने मासेमारी सुरूच ठेवत असल्याचे निष्पन्न झाले आहे. महत्वाची बाब म्हणजे या कालावधीत होणारी अवैध मासेमारी रोखण्यात यंत्रणांना अपयश येत असल्याचेही समोर आले आहे.
उरण मधील करंजा येथील मनोहर कोळी यांची तुळजाई नावाची मासेमारी बोट शनिवारी सकाळी आठ मच्छीमारांनी घेऊन मासेमारीसाठी निघाली होती. मात्र खांदेरी किल्ल्यावर लांटा आणि खराब हवामानामुळे ही बोट बुडाली. बोटीतील पाच मच्छीमार ९ तास पोहून किनाऱ्याला लागले. तर तिघांचा बुडून मृत्यू झाला. बंदी काळात मासेमारी करण्याचा मोह तीन मच्छीमारांच्या जीवावर बेतला. या घटनेमुळे करंजा बंदरातून बंदी काळात सुरू असलेल्या मासेमारीचा वास्तवही समोर आले. बंदी काळात मासेमारी रोखण्यासाठी असलेली यंत्रणा कशी कुचकामी आहे हे देखील यामुळे समोर आले आहे.
रायगड जिल्ह्यात साडेचार हजार नोंदणीकृत यांत्रिक मासेमारी नौका आहेत, तर ४५ मासेमारी उतरविण्याची केंद्र आहेत. या ठिकाणांवर अवैध मासेमारीवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी चार परवाना अधिकाऱ्यांवर आहे. ज्यातील एक पद रिक्त आहे. अवैध मासेमारीवर रोखण्यासाठी आवश्यक असलेले मनुष्यबळ मत्स्यव्यवसाय विभागाकडे नसल्याची बाब समोर आली आहे. जिल्ह्यात मत्स्यव्यवसाय विभागाची ४१ मंजूर पदे आहेत ज्यापैकी १९ भरलेली आहे तर उर्वरित रिक्त आहे. मत्स्यव्यवसाय विभागाकडे नजर ठेवण्यासाठी एक गस्ती नौका आहे. मात्र पावसाळ्यात खोल समुद्रात गस्ती नौका नेणे शक्य होत नाही. १२० किलोमीटरच्या विस्तीर्ण समुद्र किनाऱ्यावर लक्ष्य ठेवण्यात ही यंत्रणा अपुरी ठरते.
बंदी काळात खोलसमुद्रात मासेमारीसाठी मच्छीमारांनी जाऊ नये यासाठी आम्ही प्रबोधन आणि कारवाई दोन पातळ्यांवर काम करतो. गेल्या दोन महिन्यात ३८ मच्छीमारांवर बंदी आदेश मोडल्या प्रकरणी दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. २९ लाखांचा दंड वसूल केला आहे. महेश खरात, मत्सव्यवसाय विस्तार अधिकारी