
सरकारी रुग्णालयात रुग्णालय कक्षाचे शुटिंग करणाऱ्या महिला पत्रकाराविरुध्द गुन्हा! ठोर कारवाईसाठी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती लावून आंदोलन!!
कल्याण : आपण पत्रकार आहोत, रुग्णालयातील शुटिंगसाठी आपणास कोणाच्या परवानगीची गरज नाही, असे सांगून शहापूरमधील उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांच्या कक्षात रुग्ण सेवा करणाऱ्या परिचारिका, रुग्णांचे आपल्या मोबाईल कॅमेऱ्यातून दृश्यध्वनी चित्रण करून ते समाज माध्यमांत प्रसारित करणाऱ्या आणि या माध्यमातून रुग्णालयातील परिचारिका, रुग्णालय प्रशासन यांची बदनामी करणाऱ्या एका महिला पत्रकारा विरुध्द शहापूर उपजिल्हा रुग्णालयातील अधिपरिचारिका सई कोकाटे शहापूर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे.
सुरूवातीला पोलिसांनी याप्रकरणी रुग्णालय प्रशासनाची लेखी तक्राराची मागणी केली. या महिला पत्रकारा विरुध्द गुन्हा दाखल करून कारवाई झालीच पाहिजे, अशी आग्रही मागणी करून काम बंद करण्याचा इशारा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी पोलीस प्रशासनाला दिला. महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचे अध्यक्ष संजय साबळे, कोकण उपाध्यक्ष अजय क्षीरसागर यांनी रुग्णालयाच्या वरिष्ठांना पत्र देऊन रुग्णालय प्रशासनाची बदनामी करणाऱ्या या महिला पत्रकारा विरुध्द कठोर कारवाईची मागणी केली.
सई कोकाटे यांनी पोलीस ठाण्यातील तक्रारीत म्हटले आहे, गेल्या आठवड्यात डाॅ. श्रध्दा सावंत, आपण स्वता अपघात विभागात एका रूग्णाला दाखल करून घेत होतो. तेव्हा गुन्हा दाखल महिला पत्रकाराने आमचे दृश्यध्वनी चित्रण आपल्या मोबाईल कॅमेऱ्यामधून केले. आमच्याशी वाद घातला आणि सरकारी कामात अडथळा आणला. दुसऱ्या दिवशी सकाळच्या वेळेत मी व सुवर्णा देसाई रुग्ण कक्षात रुग्ण सेवा देत असताना महिला पत्रकाराने पुन्हा आमचे मोबाईल कॅमेऱ्यातून दृश्यध्वनी चित्रण केले.
रुग्ण सेवेबाबत तक्रार असल्यास वरिष्ठांकडे तक्रार करण्याचे सुचवले. महिला पत्रकाराने तक्रारदार कोकाटे यांंचा हात झटकून मी पत्रकार आहे. मला कोणाच्या परवानगीची गरज नाही असे सांगून शासकीय काम करण्यापासून आम्हाला परावृत्त केले आणि सरकारी कामात अडथळा आणला. डाॅ. स्वप्नाली घेंगडे यांच्याशी अर्वाच्च भाषा केली. परिचारिकांचे रुग्ण सेवेचे सर्व चित्रण महिला पत्रकाराने समाज माध्यमांवर सामाईक केले. काही नागरिकांनी परिचारिका, रुग्णालयाची बदनामी होईल असे भाष्य करून रुग्णालय प्रशासनाची प्रतिमा समाजात मलीन करण्याचा प्रयत्न केला आहे, अशी तक्रार अधिपरिचारिका सई कोकाटे यांनी पोलीस ठाण्यात केली आहे.
काळ्या फिती लावून निषेध
या महिला पत्रकारा विरुध्द कठोर कारवाई झाली पाहिजे या मागणीसाठी काळ्या फिती लावून कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. येत्या पाच दिवसात या पत्रकारा विरुध्द कठोर कारवाई झाली नाहीतर बेमुदत आंदोलन करण्याचा इशारा कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाने दिला आहे.
रुग्णालयात कोणीही समाजसेवक, पत्रकार म्हणून येऊन रुग्णालय कक्ष, परिचारिका यांचे शुटिंग करून निघून जातो. हे चित्रण समाज माध्यमांत प्रसारित केले जाते. हे नियमबाह्य प्रकार थांबण्यासाठी गुन्हा दाखल महिला पत्रकारावर कठोर कारवाई झालीच पाहिजे यासाठी यापुढे आमचे आंदोलन तीव्र करणार आहोत. – अजय क्षीरसागर, कोकण उपाध्यक्ष, कास्ट्राईब फेडरेशन.