
,शिरोळ तालुक्यातील नांदणी मठातील महादेवी हत्तीण पोलीस बंदोबस्तात गुजरातला रवाना,मिरवणूक काढून भावनिक होत ग्रामस्थांनी महादेवीला दिला निरोप
कोल्हापूरच्या नांदणी मठातील महादेवी हत्तीण अखेर गुजरातच्या वनताराकडे जाण्यासाठी रवाना झाली आहे. मात्र कोर्टाच्या आदेशानंतर महादेवी हत्तीणीलाभावपूर्ण निरोप देताना नांदणीकरांचा अक्षरशः अश्रूच्या बांध फुटला आहे.
शिरोळ तालुक्यातील नांदणी मठातील महादेवी हत्तीणीला पोलीस बंदोबस्तात गुजरातला रवाना करण्यात आलं. मिरवणूक काढून भावनिक होत ग्रामस्थांनी महादेवीला निरोप दिला.
दरम्यान मिरवणुकीच्या शेवटी दगडफेक केल्याची घटना घडली आहे. या दगडफेकीमुळं पोलिसांनी लाठीचार्ज केला. हत्तीला गावातून नेण्याला विरोध असल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. मात्र पोलिसांनी सर्व परिस्थिती नियंत्रणात आणत अॅनिमल अॅम्ब्युलन्समधून हत्तीणीला रवाना करण्यात आलं. या सगळ्या मिरवणुकीदरम्यान नांदणीकराना अश्रू अनावर झाले होते.
नांदणी येथील स्वस्तिश्री भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठ नांदणी यांच्याकडे ही हत्तीण होती. महादेवी असं या हत्तीणीच नाव आहे. मुंबई उच्च न्यायालयाने एक निर्णय देताना, प्राण्यांचा गुणवत्तापूर्ण जीवनाच्या हक्काचा आणि धार्मिक विधीसाठी हत्तीच्या वापराचा संघर्ष असताना प्राण्यांच्या हक्कालाच प्राधान्य द्यावे लागेल, असे निरीक्षण नोंदवलं होतं. त्यानंतर नांदणी येथील हत्तीणीला गुजरातच्या वनतारा याठिकाणी रवाना करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. हे समजल्यानंतर ग्रामस्थांनी या हत्तीणीला नेऊ देणार नाही अशी भूमिका घेतलेली. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनंतर 28 जुलै रोजी पोलीस बंदोबस्तात तिला गुजरातला नेण्यात आलं आहे.