
लांजा नगरपंचायतीच्या विकास आराखड्याला (डीपी) जोपर्यंत स्थगिती मिळत नाही तोपर्यंत त्या विरोधातील लढा कायम चालू ठेवणार
लांजा नगरपंचायतीच्या वतीने लांजा शहराचा कृती विकास आराखडा जाहीर करण्यात आलेला आहे. मात्र लोकांना कोणत्याही प्रकारे विश्वासात न घेता हा आराखडा टंडन कंपनीने केला असून यामध्ये असंख्य त्रुटी असल्याने भविष्यात शहराचा विकास योग्य पद्धतीने करता येणार नाही .तसेच वाडी वस्तीतून दाखवण्यात आलेल्या अंतर्गत रस्त्यांमुळे सर्वसामान्य नागरिकांची घरे तुटणार आहेत. यामुळे या विकास आराखड्या विरोधात लांजा -कुवे या दोन्ही गाव परिसरातील नागरिकांतून प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे .तसेच या विरोधात लांजा नगरपंचायतीकडे सुमारे पंधराशे हरकती नोंदवण्यात आलेल्या आहेत.
. या पार्श्वभूमीवर लांजा कुवे बचाव समितीच्या वतीने आज सोमवारी सकाळी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करण्यात आली .यावेळी समितीच्या वतीने सांगण्यात आले की ज्या टंडन कंपनीने हा विकास आराखडा कार्यालयात बसून केला आहे तोच मुळात चुकीचा असल्याने आजची परिस्थिती निर्माण झाली आहे. आणि म्हणूनच भविष्यात जरी नागरिकांनी दाखल केलेल्या १५०० हरकतींपैकी जरी यातील २० % मागण्याबाबत कार्यवाही झाली नाही तरी देखील या विरोधात लढा कायम चालू ठेवणार आहोत.
मुळातच हा शहराचा प्रारूप विकास आराखड्याला स्थगिती मिळावी अशी आमची मागणी आहे. यादृष्टीने राज्याचे मस्त्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी देखील लोकांची मागणी लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन स्थगिती मिळावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले असल्याने लांजा -कुवे बचाव समितीच्या वतीने त्यांचे आभार मानण्यात आले.