
रत्नागिरी एसटी विभागाकडून गणेशोत्सवासाठी परतीच्या चाकरमान्यांसाठी 2,500 एसटी बसेसचे नियोजन
गणेशोत्सवासाठी चाकरमानी आपल्या गावी कोकणात येत असतो. त्यामुळे त्यांचा प्रवास सुखकर व्हावा म्हणून रत्नागिरी एसटी विभागाकडून परतीच्या प्रवासासाठी 2,500 एसटी बसेसचे नियोजन केले असून, ऑनलाईन आरक्षणास सुरुवातही झाली आहे.एकाच आठवड्यात तब्बल 356 एसटी बसेसचे ऑनलाईन आरक्षण झाले आहे. टप्प्याटप्प्याने आणखी एसटी गाड्यांचे आरक्षण सुरूच आहे. चाकरमान्यांनी परतीच्या प्रवासासाठी ऑनलाईन बुकिंग करावे, असे आवाहन रत्नागिरी एसटी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा देण्यात आला असून, यंदाचा गणेशोत्सव कोकणासह राज्यभरात मोठ्या जल्लोषात, दणक्यात साजरा होणार आहे. दरम्यान, गणेशोत्सवात प्रत्येक कोकणकर आपल्या मूळ गावी येत असतो. त्यामुळे नोकरी, व्यवसायानिमित्त मुंबई, पुण्यासह इतर शहरात काम करणारे चाकरमानी गणेशोत्सवात मोठ्या संख्येने गावी येत असतात. चाकरमान्यांसाठी रेल्वेकडून वतीने जादा गाड्या सोडल्या आहेत. आरक्षण खुले झाल्यानंतर पुढील काही तासातच रेल्वे आरक्षण फुल्ल झाले आह. याचबरोबर आता एसटी महामंडळाच्या वतीने मुंबईतून 5 हजार बसेसचे नियोजन करण्यात आले आहे तर परतीच्या प्रवासासाठी रत्नागिरी विभागातून तब्बल 2,500 जादा गाड्याचे नियोजन करण्यात आले होते.