मुंबई पोलीस दलातील शेवटचा एन्काउंटर स्पेशलिस्ट होतोय निवृत्त, निवृत्तीच्या दोन दिवसांपूर्वी दया नायक यांना एसीपीपदी बढती!


मुंबई शहरातील अंडरवर्ल्डचे कंबरडे मोडण्यासाठी मुंबई पोलिसांनी एन्काउंटर अस्त्राचा वापर केला असताना पोलीस दलात अनेक चकमकफे उदयाला आले होते. त्यातील ८६ एन्काउंटर करणारे पोलीस निरीक्षक दया नायक यांना सहाय्यक पोलीस आयुक्त पदी बढती मिळाली आहे. मुंबई पोलीस दलात नावारुपाला आलेल्या चकमकफेम अधिकाऱ्यांच्या यादीतील शेवटचे कार्यरत अधिकारी दया नायक ३१ जुलै रोजी सेवेतून निवृत्त होत आहेत.

लष्कर तैयब्बाच्या पाच दहशतवाद्यांशी दोन हात करून त्यातील तिघांना चकमकीत ठार मारून त्यांच्याकडून एके ४७ सारखी शस्त्रे जप्त करणाऱ्या दया नायक यांनी आपल्या कारकीर्दीत ८६ एन्काउंटर केले. या एन्काउंटरमध्ये दाऊद टोळीतील २२ गुंडांचा, राजन टोळीतील २० गुंडांचा समावेश आहे. याशिवाय लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ ईलम (एलटीटीई), लष्कर ए तैय्यबा यासारख्या प्रतिबंधक संघटनांशी संबंधित व्यक्तीनाही नायक यांनी चकमकीत ठार मारले. अशा चकमकफेम दया नायक यांना मंगळवारी सहाय्यक पोलीस आयुक्तपदावर बढती देण्यात आली आहे. १० महिन्यांपूर्वी ते एसीपी पदासाठी पात्र ठरले होते. पण निवृत्तीच्या दोन दिवस आधी त्यांना सहाय्यक पोलीस आयुक्तपदी बढती देण्यात आली आहे.

मुंबईत काळी दिवाळी साजरी झाली होती

मुंबईत अंडरवर्ल्डमध्ये टोळी युद्ध भडकले असताना ९० च्या दशकात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गोळीबार होत होता. १९९५ मध्ये मुंबई टोळीयुद्धामध्ये झालेल्या गोळीबारात १९९९ जणांचा मृत्यू झाला होता. काळी दिवाळी साजरी करून या गोष्टीचा निषेध करण्यात आला होता. त्यानंतर दया नायक यांनी १९ गुंडांचा एन्काउंटर करून गुंड टोळ्यांना प्रत्युत्तर दिले होते. मुंबई पोलिसांनी १९९८ मध्ये टॉप टेन गुंडांची यादी जारी केली होती. त्यातील सात गुंडाना नायक यांनी चकमकीत ठार केले होते.

कंधार विमान अपहरण प्रकरण

कंधार विमान अपहरण प्रकरणातील १० दहशतवादी भारतात आले होते. त्यापैकी ५ जणांनी विमानाचे अपहरण करून ते कंधारला नेले होते. त्यांच्या पाच साथीदारांशी दया नायक व त्याच्या पथकाने दोन हात केले होते. त्यात तीन दहशतवाद्यांना ठार करण्यात आले होते. या कारवाईत रॉकेट लाँचर, एके ४७ सारखी घातक शस्त्रे जप्त करण्यात आली होती.

रेल्वे स्फोटाचा तपास

आपल्या कारकीर्दीत एक हजारांहून अधिक आरोपींना अटक करणारे नायक रेल्वे स्फोटांच्या तपासातही सहभागी होते. मुंबईतील विलेपार्ले, मुंबई सेंट्रल आणि मुलुंड येथे २००२ आणि २००३ मध्ये बॉम्बस्फोट प्रकरणात प्रतिबंधित स्टुडंट्स इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडिया (सिमी) या संघटनेचा सदस्य असलेल्या साकिब नाचनला अटक करण्यात आली होती.

नायक यांच्यासह चार अधिकाऱ्यांना बढती दया नायक यांच्यासह जीवन खरात, दीपक दळवी व पांडुरंग पवार यांना सहाय्यक पोलीस आयुक्तपदी बढती देण्यात आली आहे. याबाबतचे आदेश गृहविभागाने मंगळवारी जारी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button