मुंबई-गोवा महामार्गावरील हातखंबा येथे बंद केलेली वाहतूक तब्बल १५ तासांनंतर सुरू

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील हातखंबा गावात वाणी पेठ येथे उलटलेल्या गॅस टँकरमुळे बंद असलेली महामार्गावरील वाहतूक तब्बल १५ तासांनंतर दुपारी सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास सुरळीतपणे सुरू करण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.


जयगडवरून कोल्हापूरला एलपीजीची वाहतूक करणाऱ्या ८० मेट्रिक टन क्षमतेच्या खासगी कंपनीच्या टँकर काल (२८ जुलै) रात्री साडेअकरा-बारा वाजण्याच्या सुमारास मुंबई-गोवा महामार्गावरील रत्नागिरीजवळ हातखंबा गावात वाणी पेठ इथे एका अवघड वळणावर पुलाच्या खाली पलटी झाला. हा त्यामुळे वायुगळती सुरू झाली. जिल्हा पोलीस दल, एमआयडीसीचे बचाव पथक, तसेच जिल्हा प्रशासनाने तातडीने बचावकार्याला सुरुवात केली. जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, उपविभागीय अधिकारी जीवन देसाई यांच्यासह पोलीस दलातील अनेक अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.
त्यानंतर टँकरमधून होणाऱ्या वायू गळतीमुळे परिसरातील ग्रामस्थांना त्रास होऊ नयेन यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले. अपघातग्रस्त टँकर सरळ करून त्यामधला एलपीजी दुसऱ्या टँकरमध्ये पाठवण्याचे काम करणारे विशेष वाहन आणि यंत्रणा पहाटे तीनच्या सुमारास घटनास्थळी दाखल झाली. एलपीजी दुसऱ्या टँकरमध्ये भरण्याचे काम पूर्ण झाल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी आज (२९ जुलै) दुपारी साडेबाराच्या सुमारास दिली. अपघातग्रस्त टँकर बाहेर काढल्यानंतर दुपारी सव्वादोनच्या सुमारास महामार्गावरची वाहतूक सुरळीत सुरू झाली, अशी माहिती पोलिसांनी दिली. अपघात झाल्यानंतर लगेचच मुंबई-गोवा महामार्गावरची दोन्ही बाजूंकडची वाहतूक बंद करून अन्य मार्गाने वळवण्यात आली होती. दोन्ही बाजूंना वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. अपघातात टँकरचा चालक जखमी झाला असून, सुदैवाने अन्य जीवितहानी झालेली नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button