
नाहीतर थेट निलंबन! राज्य सरकारचा मोठा निर्णय; कर्मचाऱ्यांना सोशल मीडियासाठी नियमाची ‘चौकट’
राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. गोपनीय शासकीय माहितीचा प्रसार करणं, खोट्या गोष्टी सोशल मीडियाद्वारे ( Media) पसरविणे, शासकीय नियमांचं उल्लंघन करुन समाज माध्यमांवर प्रतिक्रिया व्यक्त करणं यासह अनेक बाबी टाळण्यासाठी शासनाकडून नव्याने सूचना जाहीर करण्यात आली आहे.शासकीय सूचनांचं पालन न केल्यास कर्मचाऱ्याला शिस्तभंगकारवाईला सामोरे जावं लागणार आहे.
नव्या सूचनांचे परिपत्रक जाहीर करण्यात आलं आहे. याद्वारे आता शासकीय कर्मचाऱ्यांना गोपनीय शासकीय माहितीचा प्रसार करणं, खोट्या गोष्टी सोशल मीडियाद्वारे पसरविणे, शासकीय नियमांचं उल्लंघन करुन समाज माध्यमांवर प्रतिक्रिया व्यक्त करण्यासंदर्भात सूचना जाहीर केल्या आहेत. या परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे की, शासकीय कर्मचाऱ्यांनी फेसबुक, एक्स (पूर्वीचे ट्विटर), इन्स्टाग्राम, यूट्यूब, व्हॉट्सअॅप यासारख्या माध्यमांवर व्यक्त होताना किंवा पोस्ट करताना शासनाच्या धोरणांचे उल्लंघन होता कामा नये.गोपनीय माहिती सार्वजनिक करणं, शासनविरोधी खोट्या किंवा अप्रामाणिक माहितीचा प्रचार करणं, तसंच, जाती, धर्म, भाषा, प्रांत किंवा सामाजिक गटांमध्ये तेढ निर्माण करणाऱ्या टिप्पणी अथवा मजकुराचे प्रसारण यावर बंदी घालण्यात आली आहे. तसंच, शासकीय कर्मचाऱ्यांनी आपल्या वैयक्तिक खात्यावरून शासकीय निर्णयांविषयी टीका किंवा गैरसमज निर्माण करणारे पोस्ट करू नयेत. कोणतीही माहिती प्रसारित करण्यापूर्वी ती शासनाने अधिकृतपणे जाहीर केली आहे का? याची खातरजमा करणे आवश्यक आहे.
या सर्व गोष्टी करताना खातरजमा केल्यामुळे एकाकी माहिती ही प्रसारित होणार नाही आणि चुकीचा संदेश देखील जाणार नाही याची खबरदारी घेणं महत्वाचं आहे. दरम्यान, या नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधित कर्मचाऱ्याविरुद्ध शिस्तभंगाची प्रक्रिया राबवली जाईल, असा इशारा परिपत्रकात देण्यात आला आहे. यामध्ये सेवा नियमांचं उल्लंघन केल्यास निलंबन, वेतन कपात, पदोन्नती थांबविणे यासारख्या कारवायांचा समावेश असू शकतो.