
मोठी बातमी! ४०.२८ लाख लाडक्या बहिणींचा लाभ बंद, ‘या’ महिलांना १५०० नव्हे दरमहा मिळणार ५०० रूपयेच;
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थींची प्रत्येक निकषांनुसार पडताळणी पूर्ण करण्यात आली आहे. त्यानुसार आतापर्यंत ४० लाख २८ हजार महिला लाभासाठी अपात्र ठरल्या आहेत.याशिवाय नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेतील सुमारे १४ लाख महिला शेतकरी, ज्या लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आहेत, त्यांचा लाभ दरमहा एक हजार रुपयांनी कमी केला आहे. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे, त्या महिलांच्या नावापुढे ‘एफएससी’ (फायनान्शियल स्ट्राँग कंडिशन) असा शेरा मारून त्यांचा लाभ बंद करण्यात आला आहे.
विधानसभा निवडणुकीपूर्वी १ जुलै २०२४ पासून सुरू झालेल्या लाडकी बहीण योजनेसाठी ज्यांनी अर्ज केले, त्यांना सरसकट काही महिने लाभ देण्यात आला. पण, योजनेचे निकष कडक असताना देखील अपेक्षेपेक्षा जास्त अर्ज आले. त्यामुळे मागील पाच महिन्यांत लाभार्थींची पडताळणी करून अपात्र लाभार्थींचा शोध घेण्यात आला आहे.त्यानुसार १४ हजार २९८ पुरूष लाभार्थी, दोन हजार २८९ सरकारी महिला, संजय गांधी निराधार योजनेतील दोन लाख ३२ हजार महिला, ६५ वर्षांवरील एक लाख १० हजार महिला, एका कुटुंबातील चार लाख महिला आणि चारचाकी वाहन असलेल्या सव्वादोन लाख महिला या योजनेचा लाभ घेत होत्या हे पडताळणीतून स्पष्ट झाले. याशिवाय एक लाख ६० हजार महिलांनी स्वतःहून लाभ नाकारला. तसेच नमो शेतकरी महासन्मान योजनेतील महिला शेतकरी लाडकी बहीण योजनेत होत्या. त्यांचाही शोध घेऊन त्यांना लाडकी बहीणमधून दरवर्षी १८ हजारांऐवजी सहा हजार रुपयेच मिळणार आहेत.