
देशभक्तीचे साक्षात रक्षणसूत्र!परशुराम एज्युकेशन सोसायटीचा आगळा रक्षाबंधन उपक्रम
विद्यार्थ्यांची पोस्ट ऑफिसपर्यंत रॅली, जवानांसाठी राख्यांचे प्रेषण, ‘एक राखी एक देश’ उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद
चिपळूण (प्रतिनिधी) : शहरातील परशुराम एज्युकेशन सोसायटी संचालित युनायटेड इंग्लिश स्कूल व सुरेश दामोदर गद्रे इंग्लिश मीडियम स्कूलच्या वतीने रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर देशभक्ती जागवणारा एक आगळावेगळा उपक्रम राबवण्यात आला. ‘एक राखी, एक देश’ या संकल्पनेवर आधारित सहाशे विद्यार्थ्यांची रॅली काढण्यात आली. युनायटेड इंग्लिश स्कूल ते चिपळूण मुख्य पोस्ट ऑफिस असा या रॅलीचा मार्ग होता. विद्यार्थ्यांनी भारतीय जवानांसाठी स्वहस्ते तयार केलेल्या राख्या चिपळूण पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून देशभरातील जवानांपर्यंत पाठवण्यात आल्या.
या उपक्रमाची सुरुवात युनायटेड इंग्लिश स्कूलच्या प्रवेशद्वारावर मुख्याध्यापक विभाकर वाचासिद्ध यांच्या हस्ते सरस्वती देवी व मातृ पूजनाने झाली. दहावीतील विद्यार्थी रुद्र बांडागळे याने रॅली सुरू होण्यापूर्वी गाऱ्हाणे घातले. शाळेतील इयत्ता आठवी व नववीतील सुमारे ६०० विद्यार्थ्यांनी तिरंगा हातात घेऊन, देशभक्तिपर घोषणा देत, ‘वंदे मातरम्’, ‘भारत माता की जय’ अशा गगनभेदी जयघोषांसह रॅलीचे नेतृत्व केले. संपूर्ण मार्गभर विद्यार्थ्यांनी देशप्रेमाची उधळण केली.
विशेष म्हणजे, युनायटेड इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षण घेणाऱ्या १८ विद्यार्थ्यांचे वडील भारतीय सैन्यात कार्यरत आहेत. या विद्यार्थ्यांकडून त्यांच्या वडिलांसाठी खास राख्या तयार करून त्या त्यांच्या युनिटच्या पत्त्यावर पाठवण्यात आल्या. ही राखी केवळ बंधुभाव दर्शवणारी नसून, सैन्यातील शूर वीरांना मनोबल देणारी ठरली.
पोस्ट ऑफिस परिसरात पोहोचल्यावर युनायटेड इंग्लिश स्कूल व गद्रे इंग्लिश मीडियम स्कूलच्या महिला शिक्षकांनी पोस्ट विभागातील अधिकाऱ्यांचे औक्षण करून त्यांना राखी बांधली. यावेळी विशेष उपस्थिती लाभली ती चिपळूणचे प्रांताधिकारी आकाश लिगाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने, नगर परिषदेचे मुख्याधिकारी विशाल भोसले, प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढांबकर, नायब तहसीलदार श्री. मोरे, उद्यान विभाग प्रमुख बापू साडविलकर यांची. त्यांच्या हस्ते भारतीय जवानांसाठीच्या राख्यांची पाकिटे पोस्टमास्तर श्रीमती जोशी व अधिकारी श्री. कदम यांच्याकडे औपचारिकरित्या सुपूर्द करण्यात आली.
या प्रसंगी युनायटेड इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक विभाकर वाचासिद्ध यांनी उपक्रमामागील प्रेरणा उलगडून सांगताना सांगितले, “विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेमाची भावना निर्माण व्हावी, यासाठी ‘एक राखी, एक देश’ हा उपक्रम राबवण्यात आला. राखी हा केवळ बंधाचा उत्सव नसून, तो सुरक्षा व सन्मानाचे प्रतीक आहे.”
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात उपमुख्याध्यापक संजय बनसोडे, प्रेमजीभाई आसर स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ. नाईक, शिशुविहारच्या सौ. रानडे, गद्रे इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका श्रीमती यशोदे, प्रायमरी विभागप्रमुख सौ. गोरीवले, प्री-प्रायमरीच्या सौ. पोटसुरे, तसेच शिक्षक संदीप मुंडेकर, सर्व शिक्षक, पालक प्रतिनिधींचीही उपस्थिती लक्षणीय ठरली.
प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांनी विद्यार्थ्यांच्या शिस्तबद्ध रॅलीचे विशेष कौतुक केले. “परशुराम एज्युकेशन सोसायटीने घेतलेला हा उपक्रम शिक्षणासोबत मूल्यशिक्षण व राष्ट्रप्रेम शिकवणारा आहे,” असे गौरवोद्गार त्यांनी काढले.
कार्यक्रमाची सांगता सौ. वैशाली चितळे यांनी मुलांबरोबर महाराष्ट्र राज्य गीत गाऊन केली. या अभिनव उपक्रमामुळे चिपळूणच्या शाळकरी विद्यार्थ्यांनी भारतीय सेनेच्या सैनिकांपर्यंत राखीच्या माध्यमातून प्रेम, सन्मान आणि सुरक्षा यांचा संदेश पोहोचवला.