
ठाकरेंच्या आमदारांनी घेतली राज्यपालांची भेट
राज्याचे विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन नुकतेच संपले आहे. हे अधिवेशन विधेयक कामे आणि निर्णायमुळे न गाजता राजकीय नेत्यांच्या प्रतापांमुळे गाजले आहे. राज्यातील राजकीय अनेक राजकीय नेत्यांचे भांडणे, घोटाळे आणि मारहाण समोर आली आहे.याविरोधात आता ठाकरे पक्षाने आक्रमक भूमिका घेत राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची भेट घेतली आहे.
यावेळी ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे, अनिल परब, उपनेते विनोद घोसाळकर, नितीन नांदगावकर यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. उद्धव ठाकरेंच्या शिलेंदारांनी राज्यपालांची अचानक भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे. राज्याच्या मंत्रिमंडळातील वाचाळवीर मंत्री आणि कलंकित मंत्र्यांचा राजीनामा घेण्याबाबत त्यांनी हे पत्र लिहिले आहे.
या भेटीची माहिती देताना अंबादास दानवे म्हणाले, सत्ताधारी पक्षातील कलंकित, भ्रष्टाचारी व असंवेदनशील मंत्री व आमदार यांना तात्काळ बडतर्फ करण्याबाबत राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना पत्र दिले. राज्य मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांच्या गैरव्यवहार आणि प्रकरणाबद्दल माहिती पत्राद्वारे दिली. मंत्री संजय शिरसाठ, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे , राज्य मंत्री योगेश कदम तसेच मंत्री नितेश राणे यांच्या गंभीर प्रकरणाची वस्तुस्थिती स्थिती राज्यपाल यांच्यासमोर मांडली.
योगेश कदम यांच्या आईच्या नावावर असलेल्या बारमध्ये २२ बार गर्ल पकडल्या गेल्या. राज्याचा गृहराज्यमंत्री डान्सबार चालवतो. मुख्यमंत्री गृहमंत्री झोपलेत का? अशी विचारणा त्यांनी केली. तसेच आम्ही महायुतीच्या मंत्र्यांची तक्रार केली आहे. लोकशाहीच्या मंदिरामध्ये यांचे मंत्री रमी खेळतात.आमदार वेटरला मारतात त्याचबरोबर गैरवर्तन करतात. छावा संघटनेच्या अध्यक्षांना मारहाण होते. हे सर्व सत्ताधारी करत असताना सरकार त्यांना पाठीशी घालत असल्याचा हल्लाबोल त्यांनी केला. राज्यातील हनी ट्रॅप प्रकरण, ठाणे बोरिवली बोगदा प्रकरण, मीरा भाईंदर महापालिकेच्या भूसंपादन प्रक्रियेत गैरव्यवहार अशा अनेक प्रकरणा संदर्भात राज्यपाल यांना पत्राद्वारे माहिती दिली.