
इंग्लंडमध्ये रत्नागिरीच्याअविराज गावडेची विजयी घोडदौड सुरूच, ब्रिटीश प्रिमियर लीगमध्ये दाखवला गुगलीचा जलवा, प्रिमियर लीगमध्ये सुद्धा पटकावला सामनावीर पुरस्कार
रत्नागिरीचा युवा क्रिकेटपटू अविराज अनिल गावडे हा सध्या इंग्लंडमध्ये क्रिकेट कौंटी व प्रिमियर लीग खेळत असून इंग्लंडमधील ब्रिटीश प्रिमियर लीगमध्ये खेळताना काल रविवारी झालेल्या सामन्यामध्ये ५ विकेटस मिळवत सामनावीर पुरस्कार जिंकला. ब्रिटीश प्रिमियर लीग ही इंग्लंडमधील सर्वात मोठी प्रतिष्ठीत क्रिकेट लीग आहे. या लीगमध्ये अनेक देशातील इंटरनॅशनल क्रिकेटर्स सहभागी होत असतात.
अविराजने वालवई ब्ल्यू या संघाकडून खेळताना मेटॉन बॉईज संघाविरूद्ध ८ षटकं टाकत फक्त २६ धावा देवून ५ विकेटस घेतल्या. यामध्ये त्याने ३.२५ ची सरासरी राखली. अविराजने आपल्या गुगलीवर चार फलंदाजांना त्रिफळाचित करून एका फलंदाजाला लेग स्पीनवर बाद केले.
इंग्लंडमध्ये सध्या चालू असलेल्या कौंटी क्रिकेट लिगमध्ये सुद्धा अविराजने याआधी तीन वेळा सामनावीर पुरस्कार मिळवला आहे. बॅटींग, बॉलिंग व फिल्डींग अशा तिनही क्षेत्रात अविराज लक्षणीय कामगिरी करत आपल्या रत्नागिरी जिल्ह्यासह रत्नागिरीचे नाव इंग्लंडमध्ये सतत उज्वल करत आहे. तसेच अनेक दिग्गज इंटरनॅशनल क्रिकेटर्सनी अविराजच्या गुगलीचे विशेष कौतूक केले आहे. इंग्लंडमधील खेळपट्ट्या या विशेषतः वेगवान गोलंदाजांसाठी पोषक असतात असे असूनही अविराजने आपल्या लेग स्पीन व गुगलीची विशेष छाप पाडली असल्यामुळे त्याचे विशेष कौतूक होत आहे.