
रत्नागिरीत हिंदू राष्ट्र-जागृती आंदोलन
रत्नागिरी : तेलंगणा येथील आमदार टी. राजासिंह ठाकूर यांना ठार मारण्याच्या धमक्या देणार्यांवर कठोर कारवाई करावी तसेच टी. राजासिंह यांच्या संवैधानिक अधिकारांचे रक्षण होण्यासाठी त्यांना कारागृहातून मुक्त करावे. तसेच महाराष्ट्रात तत्काळ ‘लव्ह जिहादविरोधी कायदा’ आणि ‘धर्मांतरबंदी कायदा’ लागू करावा, या मागण्यांसाठी बुधवारी मारुती मंदिर, रत्नागिरी येथे हिंदू राष्ट्र-जागृती आंदोलन करण्यात आले. यावेळी टी. राजासिंह यांच्यावरील कारवाईचा आणि लव्ह जिहाद षड्यंत्राचा निषेध करण्यात आला.
निवेदनानुसार, तेलंगणा येथील प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजासिंह यांना एका पंथाच्या श्रद्धा दुखावल्याप्रकरणी अटक झाल्यावर न्यायालयाने त्यांना जामीन दिला होता; मात्र तेलंगणा सरकारने त्यांना जुन्या प्रकरणात प्रतिबंधात्मक स्थानबद्धता कायद्यांतर्गत जाणीवपूर्वक अटक करून 1 वर्ष तुरुंगात ठेवण्याचा भयंकर कट रचला आहे. अटकेपूर्वी आणि अटकेनंतर त्यांना ‘सर तनसे जुदा’सारख्या धमक्या देत हिंसक आंदोलने केली गेली. राजासिंहाना न्याय मिळण्याची शक्यता धुसर असल्याने केंद्र सरकारने याप्रकरणी हस्तक्षेप करून त्यांच्यावरील सर्व खटले महाराष्ट्र किंवा कर्नाटक किंवा गोवा राज्यांत हस्तांतरित करावेत, अशी मागणी आजच्या आंदोलनात करण्यात आली. लव्ह जिहादसाठी विदेशातून होणारा अर्थपुरवठा, युवतींची तस्करी आणि त्यांचा आतंकवादी कारवायांसाठी होणारा वापर यांची चौकशी करून हे षड्यंत्र हाणून पाडावे इत्यादी मागण्याही आंदोलनात करण्यात आल्या.
आंदोलनानंतर जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांना निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हा समन्वयक विनोद गादीकर, विनय पानवलकर, संजय जोशी, बजरंग दलाचे विराज चव्हाण आणि राजू मोरे, विश्व हिंदू परिषदेचे दीपक जोशी, दीपक सिंह देवल, रवींद्रसिंह राणावत, गणेश चौधरी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे युवराज चिखले, माजी नगरसेविका शिल्पा सुर्वे आदी पदाधिकारी उपस्थित होते.