डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल नाहीच! मारिया कोरिना मचाडो यांना मिळाला शांततेचा नोबेल पुरस्कार!

  • नॉर्वेजियन नोबेल समितीने शुक्रवारी मारिया कोरिना मचाडो यांना, व्हेनेझुएलाच्या नागरिकांच्या लोकशाही हक्कांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि हुकूमशाहीतून लोकशाहीकडे न्याय्य आणि शांततापूर्ण मार्गाने जाण्यासाठी केलेल्या संघर्षासाठी २०२५ चा नोबेल शांतता पुरस्कार जाहीर केला आहे. ओस्लो येथे शुक्रवारी विजेत्याच्या घोषणा करण्यात आली. नॉर्वेजियन नोबेल समितीने सादर केलेल्या या प्रतिष्ठित पुरस्कारासाठी यावर्षी ३३८ नामांकने मिळाली होती, ज्यामध्ये २४४ व्यक्ती आणि ९४ संस्थांचा समावेश होता.

दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, आपण जगातील अनेक युद्धे शांततेच्या मार्गाने थांबवल्याचा दावा करत, आपल्यालाच या वर्षीचा शांततेचा नोबेल पुरस्कार मिळावा, अशी इच्छा सातत्याने व्यक्त करत होते. याचबरोबर अनेक देशांनी डोनाल्ड ट्रम्प यांना हा पुरस्कार मिळावा म्हणून पाठिंबाही दिला होता. पण नॉर्वेजियन नोबेल समितीने डोनाल्ड ट्रम्प यांना डावलत, मारिया कोरिना मचाडो यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले.

व्हेनेझुएलाच्या आयर्न लेडी

लोकशाही हक्कांना प्रोत्साहन देण्यासाठी केलेल्या कामासाठी व्हेनेझुएलाच्या आयर्न लेडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मारिया कोरिना मचाडो यांचे नाव टाईम मासिकाच्या ‘२०२५ च्या १०० सर्वात प्रभावशाली व्यक्तीं’च्या यादीतही आहे.

२०२५च्या शांततेच्या नोबेल पुरस्कार विजेत्याची घोषणा करताना नोबेल समितीने म्हटले आहे की, “व्हेनेझुएलाच्या नागरिकांच्या लोकशाही हक्कांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि हुकूमशाहीतून लोकशाहीकडे न्याय्य आणि शांततापूर्ण मार्गाने जाण्यासाठी केलेल्या संघर्षासाठी त्यांना शांततेचा नोबेल पुरस्कार देण्यात येत आहे.”

डोनाल्ड ट्रम्प यांचा अपेक्षाभंग

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने दावे करत आहेत की, त्यांनी भारत-पाकिस्तानसह अनेक देशांमध्ये सुरू असलेली युद्धे शांततेच्या मार्गाने संपवली आहेत. त्यामुळे ते यंदाच्या शांततेच्या नोबेल पुरस्काराचे दावेदार आहेत.

गेल्या महिन्यात ट्रम्प यांनी अमेरिकेत झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या महासभेतही आपण शांततेचा नोबेल पुरस्कार मिळवण्यासाठी योग्य व्यक्ती असल्याचे म्हटले होते. ते म्हणाले होते की, “प्रत्येकजण म्हणतो की मला नोबेल शांतता पुरस्कार मिळाला पाहिजे. पण मला फक्त लोकांचा जीव वाचवण्याची काळजी आहे. मला पुरस्कार जिंकण्याची चिंता नाही. आम्ही सात युद्धांमध्ये लाखो लोकांचे जीव वाचवले आहेत. आम्हाला आणखी युद्धे थांबवायची आहेत, ज्यांवर आम्ही काम करत आहोत.”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button