
१०६ वर्षांच्या धोंडबाराव सुर्वे यांचे वार्धक्याने निधन.
पालवण (चिपळूण) :: येथील १०६ वर्षे वयाचे ज्येष्ठ ग्रामस्थ आणि बैलगाडी व्यावसायिक धोंडबाराव रामराव सुर्वे यांचे (२५ जुलै) दुपारी वार्धक्याने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा (२६ जुलै) सकाळी १० वाजता त्यांच्या पालवण मधील राहत्या घरापासून निघेल. नुकताच कुटुंबीयांनी ३ फेब्रुवारी रोजी त्यांचा वाढदिवस साजरा केला होता. धोंडबाराव सुर्वे यांचा बैलगाडीचा व्यवसाय त्याकाळी पंचकोशीत प्रसिद्ध होता. जेव्हा वाहनांची सोय नव्हती तेव्हा चिपळूणला प्रवाशांना घेवून येणे-जाणे तसेच मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांना गोवळकोट धक्यापर्यंत आणून सोडण्याचे काम आपल्या बैलगाडीतून ते करीत असत.
गोवळकोट धक्क्यावर उतरलेल्या पंचक्रोशीतील प्रवाशांना त्यांच्या गावापर्यंत सोडण्याचे काम ते करीत होते. चिपळूण नगरपरिषदेची सध्याची जी इमारत आहे तिच्या उभारणीसाठी लागलेल्या वाळू वाहतुकीसाठी त्यांची बैलगाडी त्यावेळी नगर परिषदेने भाड्याने घेतल्याची आठवण सांगितली जाते. त्यांच्या पश्चात विवाहित दोन मुलगे, एक मुलगी, नातवंडे व पतवंडे असा मोठा परिवार आहे.