
रत्नागिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने मोठी कारवाई,राजिवडा येथे ९० हजार किमतीचे ब्राऊन हेरॉईन जप्त, दोघांना अटक
रत्नागिरी जिल्ह्यात अमली पदार्थ विरोधी गुरुवारी रात्री रत्नागिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत ९०,५०० रुपये किमतीचे ११ ब्राऊन हेरॉईन आणि इतर संबधित साहित्य जप्त करण्यात आले असून याप्रकरणी दोघांना राजिवडा येथून अटक करण्यात आली आहे. पोलिस अधिक्षक नितीन बगाटे आणि अपर पोलिस अधीक्षक बाबुराव महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे.
पोलिस विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांच्या नेतृत्वाखालील पथक गुरवारी, २४ जुलै रोजी रत्नागिरी शहरात गस्त घालत होते. त्यावेळी त्यांना गोपनीय माहितीच्या आधारे राजीवडा ते कर्ला रोडवरील बुडये मोहल्ला परिसरात दोन संशयित व्यक्ती हातात पिशवी घेऊन फिरत आहेत.पथकाने तत्काळ या माहितीवर कार्यवाही करत मुस्तकीम युसुफ मुल्ला आणि मोहसीन नूरमोहम्मद फणसोपकर (दोघेही रा. राजीवडा) या दोघांना ताब्यात घेतले. पंचांसमक्ष त्यांच्याकडील पिशवीची तपासणी केली असता, त्यात ‘ब्राऊन हेरॉईन’ या अमली पदार्थाच्या १७५ पुड्या विक्रीसाठी आणल्याचे उघड झाले. पोलिसांनी तात्काळ हेरॉईन आणि इतर मुद्देमाल जप्त केला. या दोघांवर रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला अधिक तपास शहर पोलिस करीत आहेत.
पोलीस अधीक्षक नितीन बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक बाबुराव महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली ही यशस्वी कामगिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांच्यासह पोलीस उपनिरीक्ष संदीप ओगले, सहायक पोलिस फौजदार सुभाष भागणे, पोलिस हवालदार शांताराम झोरे, नितीन डोमणे, बाळू पालकर, वैष्णवी यादव, भैरवनाथ सवाईराम, सत्यजीत दरेकर,योगेश नार्वेकर, विनायक राजवैद्य आणि चालक अतुल कांबळे यांनी पार पाडली.