
मोहन भागवतांचा निषेध म्हणून नितेश राणेंनी राजीनामा द्यावा”, संजय राऊतांचा चिमटा!
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) प्रमुख मोहन भागवत यांनी दिल्ली येथील एका मशिदीला भेट देत स्थानिक मुस्लीम नेत्यांशी संवाद साधला. मोहन भागवत यांनी ऑल इंडिया इमाम ऑर्गनायझेशनचे उमर अहमद इलयासी यांची भेट घेतली. त्यांच्याबरोबर इतर मुस्लीम नेते देखील या बैठकीत उपस्थित होते. बंद दाराआड पार पडलेली ही बैठक जवळपास एक तास चालली. या बैठकीनंतर देशभर वेगवेगळ्या चर्चा रंगू लागल्या आहेत.दरम्यान, आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत हे मुस्लीम धर्मगुरूंना भेटत असतील, त्यांच्याशी चर्चा करत असतील तर नितेश राणे यांनी ताबडतोब त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला पाहिजे असं वक्तव्य शिवसेनेचे (ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी केलं आहे.
मोहन भागवतांनी मशिदीला दिलेली भेट ही नितेश राणे यांच्या विचारांविरोधात आहे असा चिमटा देखील राऊत यांनी काढला आहे.संजय राऊत म्हणाले, “मोहन भागवत मुस्लीम समाजातील प्रमुख मौलवींशी चर्चा करत असतील, त्यांची मतं समजून घेत असतील, त्यांच्याविषयी सहानुभूती दाखवत असतील तर ते टिळा लावणारे नेते अस्वस्थ झाले असतील. बहुतेक ते नितेश राणे असावेत. त्यांनी ताबडतोब राजीनामा दिला पाहिजे. त्यांनी मंत्रिपदी राहू नये. राणे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देऊन मोहन भागवतांच्या मशीद भेटीचा निषेध नोंदवायला पाहिजे.”
*शिवसेनेचे (ठाकरे) खासदार म्हणाले, “देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात आणि उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रिमंडळात बसलेल्या लोकांना मोहन भागवत यांनी मुस्लीम धर्मगुरूंशी केलेली चर्चा मान्य नसेल तर त्यांनी ताबडतोब राजीनामे द्यायला हवेत. नितेश राणे यांना सरसंघचालकांची भूमिका, त्यांचे विचार पटत नसतील तर त्यांनी मंत्रिपद सोडून द्यावं.”“नितेश राणेंचे जुने फोटो बघा, कुठे नमाज पठण करत आहेत, कुठे रोजा सोडत आहेत, त्यांचे वडील मियाँ नारायण राणे हे देखील या गोष्टी करताना दिसतील. ही मंडळी लोकांना फसवत आहे. त्यामुळे नितेश राणे यांना मोहन भागवत यांचं कार्य मान्य नसेल तर त्यांनी ताबडतोब मंत्रिपदाचा राजीनामा द्यायला हवा. कारण हिंदुत्वाच्या मुद्द्यावर ते सतत वाटाण्यासारखे उडत असतात.”
मोहन भागवत यांनी मुस्लीम धर्मगुरुंशी बंद दाराआड तासभर चर्चा केली. या भेटीबद्दल सुहैब इलयासी (उमर इलयासी यांचे पुत्र) म्हणाले, “या भेटीने देशभरात एक चांगला संदेश गेला आहे. आम्ही एका कुटुंबाप्रमाणे चर्चा केली. आमच्या निमंत्रणानंतर मोहन भागवत भेटीसाठी आले होते.” दुसऱ्या बाजूला, सरसंघचालक देशातील धार्मिक सौहार्द वाढवण्यासाठी मुस्लीम बुद्धीजीवींना भेटत असल्याचं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून सांगण्यात येत आहे.