
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ;धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष23 हजार 269 लाभार्थ्यांना 148 कोटी 60 लाख 2 हजारची मदत
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी, धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष आणि नैसर्गिक/कृत्रिम आपत्तीमधून 1 जानेवारी ते 30 जून दरम्यान एकूण 23 हजार 269 लाभार्थ्यांना 148 कोटी 60 लाख 2 हजार रुपयांची मदत करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील शेकडो गरीब व गरजू रुग्णांना दिलासा मिळाला आहे.
मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीसाठी अर्ज प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे:
अर्ज व आवश्यक कागदपत्रे aao.cmrf-mh@gov.in याई-मेल आयडीवर पाठविणे आवश्यक आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा विहित नमुन्यातील अर्ज संबंधित संकेतस्थळावरून (उदा. cmrf.maharashtra.gov.in) किंवा जिल्हाधिकारी कार्यालयातून प्राप्त करावा. अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे स्व-साक्षांकित (Self Attested) करून जोडावीत. पूर्ण भरलेला अर्ज आणि कागदपत्रे आपल्या जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयातील मुख्यमंत्री सहायता कक्षात सादर करावीत. काही जिल्ह्यांमध्ये ऑनलाईन अर्ज स्वीकारण्याची सोय देखील उपलब्ध आहे.
अर्ज सादर केल्यानंतर त्याच्या स्थितीची माहिती घेण्यासाठी संबंधित कार्यालयात संपर्क साधता येतो. अनेक ठिकाणी यासाठी टोल फ्री क्रमांक किंवा ऑनलाईन ‘अर्ज स्थिती’ तपासण्याची सुविधा उपलब्ध आहे. अर्ज (विहीत नमुन्यात). रुग्ण दाखल असल्यास त्याचा Geo Tag फोटो सोबत जोडणे / पाठवणे बंधनकारक आहे. निदान व उपचारासाठी लागणाऱ्या वैद्यकीय खर्चाचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. (खासगी रुग्णालय असल्यास सिव्होल सर्जन यांचेकडून हॉस्पिटल खर्चाचे अंदाजपत्रक प्रमाणित करणे आवश्यक आहे.) तहसिलदार कार्यालयाचा उत्पन्नाचा दाखला घालू वर्षाचा (रुपये 1.60 लाखांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे.) रुग्णाचे आधार कार्ड (महाराष्ट्र राज्याचे) लहान बाळासाठी (बाल रुग्णांसाठी) आईचे आधारकार्ड आवश्यक आहे. रुग्णांचे रेशनकार्ड (महाराष्ट्र राज्याचे). संबंधित आजाराचे रिपोर्ट असणे आवश्यक आहे. अपघातग्रस्त रुग्णांसाठी FIR रिपोर्ट आवश्यक आहे. प्रत्यारोपण रुग्णांसाठी ZTCC / शासकीय समितीची मान्यता आवश्यक आहे. रुग्णालयाची नोंद मुख्यमंत्री सहाय्यता निधी कार्यालयाच्या संगणक प्रणालीवर असल्याची खात्री करावी.
अर्थसहाय्याची मागणी ई-मेल द्वारे केल्यास अर्जासह सर्व कागदपत्रे PDF स्वरूपात (वाचनीय) पाठवून त्याच्या मूळ प्रती मुख्यमंत्री सहाय्यता निधीकडे टपालाद्वारे तत्काळ पाठविण्यात यावेत.
1 जानेवारी 2025 ते 30 जून 2025 दरम्यान या सहा महिन्यांच्या कालावधीत राज्यभरातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल 14 हजार 651 रुग्णांना 128 कोटी 6 लाख 68 हजार रुपयांची वैद्यकीय मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून मंजूर करण्यात आली आहे.वारीच्या काळात ‘चरणसेवा’ उपक्रमाद्वारे 2.75 लाख वारकऱ्यांना वैद्यकीय सेवा देण्यात आली, तर 10 लाखांहून अधिक नागरिकांपर्यंत आरोग्य विषयक जनजागृती पोहोचविण्यात आली.
मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी मधून 14 हजार 651 रुग्णांना 128 कोटी 6 लाख 68 हजार, धर्मादाय मधून 8 हजार 507 रूग्णांना 15 कोटी 24 लाख 34 हजार, तसेच नैसर्गिक/कृत्रिम आपत्ती मधून 111 व्यक्तींना 5 कोटी 29 लाख अशी एकूण एकूण – 23 हजार 269 लाभार्थ्यांना 148 कोटी 60 लाख 02 हजार रुपयांची मदत करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष हे महाराष्ट्रातील गरजू रुग्णांसाठी एक महत्त्वाचे आणि संवेदनशील पाऊल आहे. राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय समित्यांच्या माध्यमातून, तसेच स्पष्ट पात्रता निकषांमुळे, ही योजना आर्थिक अडचणींमुळे कोणाचाही उपचार थांबू नये, यासाठी कार्यरत आहे. या कक्षाच्या माध्यमातून मिळणारी मदत खरोखरच अनेक गरजू कुटुंबांसाठी आशेचा किरण ठरत आहे. -प्रशांत कुसुम आनंदराव सातपुते
जिल्हा माहिती अधिकारी, रत्नागिरी