
पालघरला ‘रेड अलर्ट’चा इशारा; उद्या शाळा-महाविद्यालये बंद, धरणांतून पाण्याचा विसर्ग वाढला!
पालघर : भारतीय हवामान खात्याने पालघर जिल्ह्यासाठी आज ‘ऑरेंज अलर्ट’ व उद्या (२६ जुलै) अतिवृष्टीचा ‘रेड अलर्ट’ देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या, शाळा आणि महाविद्यालयांना २६ जुलै रोजी सुट्टी जाहीर केली आहे. जिल्ह्यात सध्या अतिवृष्टी सुरू असून येत्या २४ तासांत काही ठिकाणी अत्यंत जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच काही धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे.
सततच्या पावसामुळे जिल्ह्यातील प्रमुख धरणांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. आज दुपारपासून तानसा, मोडकसागर आणि मध्य वैतरणा धरणांमधून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. सकाळी ११ वाजता तानसा धरणाचे एकूण २० दरवाजे उघडण्यात आले असून धरणातून सकाळी ११ वाजता २२,१०० क्युसेक आणि दुपारी ३ वाजेपर्यंत २३,२१०.४६ क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे. सकाळी ६ ते दुपारी ३ वाजेपर्यंत येथे ७३.०० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
मोडकसागर धरण येथून १४,१७८ क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे. याच कालावधीत ६५.०० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. मध्य वैतरणा धरणातून २०१३ क्युसेक पाणी विसर्ग होत आहे. येथे ४८.०० मिलिमीटर पाऊस झाला.
२६ जुलै रोजी पावसाचे प्रमाण वाढून तुरळक ठिकाणी अत्यंत जोरदार पावसाचा इशारा (रेड अलर्ट) दिला आहे. २७ जुलै रोजी काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज असून २८ जुलैपासून पावसाचे प्रमाण कमी होऊन मध्यम स्वरूपात पाऊस राहील, असे जिल्हा कृषी हवामान केंद्र, कृषी विज्ञान केंद्र, कोसबाडने कळवले आहे. नागरिकांनी सतर्क राहावे, आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडू नये आणि प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
जिल्हा कृषी हवामान केंद्राने शेतकऱ्यांना उद्याच्या मुसळधार पावसाच्या इशाऱ्यामुळेभात पुनर्रलागवड पुढे ढकलण्याचा सल्ला दिला आहे. तसेच भात व नागली रोपवाटिकेतून पाण्याचा योग्य निचरा होण्याची व्यवस्था करावी. नवीन लावलेली फळझाडे वादळी वाऱ्याने कोलमडून पडू नयेत यासाठी त्यांना काठीचा आधार देण्यास सांगितले आहे. जुन्या आणि नवीन फळबागेतून पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था करावी आणि औषध फवारणी व खते देण्याची कामे टाळावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार, २६ जुलै रोजी अंगणवाड्या, सरकारी व खाजगी प्राथमिक व माध्यमिक शाळा, जिल्हा परिषद शाळा, नगरपालिका शाळा, अनुदानित व विनाअनुदानित शाळा, सर्व आश्रमशाळा, सर्व महाविद्यालये तसेच आयुक्त व्यवसाय व प्रशिक्षक केंद्र यांच्या आस्थापनेवरील शैक्षणिक संस्थांना सुट्टी असेल. तथापि, या कालावधीत सर्व मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यालयीन वेळेत उपस्थित राहून स्थानिक प्रशासनाच्या आदेशानुसार आपत्ती व्यवस्थापनाचे कामकाज करावे असे निर्देश देण्यात आले आहेत.