ना. नितेश राणे, ना. उदय सामंत यांच्या हस्ते मिरकरवाडा बंदर विकास कामांचे रविवारी भूमिपूजन

ना. योगेश कदम, माजी केंद्रीय मंत्री खा. नारायण राणे, खा. सुनील तटकरे यांची प्रमुख उपस्थिती रत्नागिरीच्या मत्स्य व्यवसायाला मिळणार नवी दिशा

रत्नागिरी | : अनेक वर्षांपासून रखडलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील महत्वाच्या मिरकरवाडा मासेमारी बंदराच्या विकास कामांचा भूमिपूजन समारंभ रविवार, २७ जुलै २०२५ रोजी सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्र मत्स्योद्योग विकास महामंडळ मर्यादित, मुंबई यांच्या वतीने केंद्र व राज्य पुरस्कृत योजनेअंतर्गत हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे, ज्यामुळे रत्नागिरीच्या मत्स्य व्यवसायाला मोठी चालना मिळेल अशी अपेक्षा आहे.

हे भूमिपूजन मत्स्यव्यवसाय तथा बंदरे मंत्री नितेश राणे आणि उद्योग, मराठी भाषा तथा रत्नागिरीचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या शुभहस्ते भूमिपूजन होणार आहे. तसेच गृहराज्यमंत्री योगेश कदम, रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार तथा माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे, खासदार सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडणार आहे.
यावेळी विधानपरिषद सदस्य आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, आमदार निरंजन डावखरे, चिपळूणचे आमदार शेखर निकम, गुहागर विधानसभेचे आमदार भास्कर जाधव, आणि लांजा-राजापूर विधानसभेचे आमदार किरण सामंत यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
याव्यतिरिक्त, मत्स्यव्यवसाय आयुक्त किशोर तावडे, सचिव डॉ. रामास्वामी एन., रत्नागिरीचे जिल्हाधिकारी एम. देवेंद्रसिंग, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदही रानडे, आणि जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे हे अधिकारी देखील उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्र मत्स्योद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अविनाश पाठक यांनी या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

मिरकरवाडा हे महत्त्वाचे बंदर असूनही अनेक वर्षांपासून अनधिकृत बांधकामामुळे त्याचा विकास रखडला होता. मात्र, मत्स्यव्यवसाय तथा बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या पुढाकाराने २७ जानेवारी २०२५ रोजी या बंदरावरील जुनी अनधिकृत बांधकामे हटवण्यात आली, ज्यामुळे संपूर्ण परिसर आणि त्यामुळेच विकासाचा मार्ग मोकळा झाला.
१९८६ साली मिरकरवाडा बंदर बांधून पूर्ण झाले होते. त्यानंतर अनधिकृत बांधकामामुळे येथील विकास रखडला. २०१३ मध्ये मिरकरवाडा बंदराच्या दुसऱ्या टप्प्याचे भूमिपूजनही झाले होते, परंतु अनेक कामे अपूर्ण राहिली होती. ना. नितेश राणे यांच्या पुढाकारामुळे आता ही अपूर्ण कामे पूर्णत्वास जाणार असल्याने रत्नागिरीतील मत्स्य व्यवसायाला झळाळी मिळणार आहेत. या विकासामुळे राज्याच्या आणि देशाच्या उत्पन्नातही वाढ होण्यास मदत होईल असे मत व्यक्त केले जात आहे. *ना.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button