
चिपळूणची मातीच कसदार, मी केवळ निमितमात्र ‘लोटिस्मा’ आयोजित गौरव सोहळ्यात मुख्याधिकारी भोसले यांचे प्रतिपादन
चिपळूण :: चिपळूणची मातीच सकस आणि कसदार असून मी केवळ निमितमात्र आहे. कोकणभूमीची मानसिक, बौद्धिक, कलात्मक साफसफाई करण्याचे काम ‘लोटिस्मा’ करते आहे. अशा संस्थेने नगरपालिकेचा गौरव केला ही गोष्ट आमच्यासाठी फारच अभिमानाची आणि जबाबदारी वाढवणारी आहे. यापुढेही नगरपालिकेकडून ‘लोटिस्माला सर्वतोपरी साहाय्य केले जाईल. असे प्रतिपादन चिपळूण नगर परिषदेचे मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी केले.

केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानात चिपळूण नगरपालिकेला राज्यात १४ व्या तर देशात ८७ व्या मानांकनाने गौरविण्यात आले. चिपळूण नगरपालिकेच्या या यशाबद्दल लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिरातर्फे आयोजित गौरव सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर घरडा केमिकल्स लोटे कंपनीचे साईट हेड आर सी. कुलकर्णी, प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढांबकर, आरोग्य विभाग प्रमुख वैभव निवाते, आरोग्य निरीक्षक सुजित जाधव, वाचनालयाचे अध्यक्ष डॉ. यतीन जाधव उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला फावडे, धमेलं, खराटा या सफाई औजारांचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यांत आले. त्यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आर. सी. कुलकर्णी यांच्याहस्ते सफाई कर्मचाऱ्यांचा आणि मुख्याधिकारी भोसले यांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. कर्मचाऱ्यांच्या वतीने आरोग्य निरीक्षक सुजित जाधव यांनी सत्काराला उत्तर देताना लोटिस्माच्या गुणग्राहकतेला धन्यवाद दिले. याप्रसंगी बांधकाम व्यावसायिक प्रशांत पाटेकर यांनी, या उपक्रमाचे साक्षीदार होता आले याबद्दल आनंद व्यक्त केला आणि वाचनायाला सहकार्य करण्याचे जाहीर केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. यतिन जाधव यांनी केले. याच कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालय, अपरांत हास्पिटल, रोहीदास समाज सेवा संघ, सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट चिपळूण याही संस्थाच्या वतीने नगरपालिका आणि मुख्याधिकारी यांना सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धीरज वाटेकर यांनी तर मानपत्राचे वाचन मनीषा दामले यांनी केले. आभार विनायक ओक यांनी मानले. यावेळी प्रकाश देशपांडे, बापू साडविलकर, राष्ट्रपाल सावंत, सुनील खेडेकर, समीर जानवलकर, सुरेश चिपळूणकर, अरुण इंगवले, रमण डांगे, संजय आलवे, अमित ओक, सुमेध करमरकर, प्रदीप पवार, प्राची जोशी आदी मान्यवर उपस्थित होते. शहरातील सेवादूतांच्या उपस्थितांनी बाळशास्त्री जांभेकर सभागृह भरून गेले होते.
