आरटीओ कार्यालयाजवळ रेल्वेची धडक बसून बिबट्या मृत

रत्नागिरी : येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालया जवळील (आरटीओ ऑफिस) रेल्वे रुळावर मादी जातीचा बिबट्या पडला असल्याची माहिती २४ जुलै रोजी रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास वन विभागाला प्राप्त झाली होती. या घटनेची दखल घेत तत्काळ वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले; मात्र हा बिबट्या मृत असल्याचे निदर्शनास आले. रेल्वे रुळावर आडवा आल्याने मुंबईकडून मडगावच्या दिशेने धावणारी मत्स्यगंधा एक्सप्रेसची (गाडी क्रमांक १२६१९) धडक बिबट्याला बसल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

याबाबत वन विभागाकडून उपलब्ध झालेल्या माहितीनुसार, २४ जुलै रोजी रात्री १०.३० च्या दरम्यान मुंबईकडून मडगावच्या दिशेने धावणारी मत्स्यगंधा एक्सप्रेस (गाडी क्रमांक १२६१९) येथील आरटीओ ऑफिसजवळील रेल्वे पुलाजवळ बिबट्या रेल्वे रुळावर आडवा आल्याने रेल्वेची धडक बसून मृत झाला. याबाबतची माहिती रेल्वे पोलिस पृथ्वीराज चव्हाण यांनी परिक्षेत्र वन अधिकारी (रत्नागिरी) प्रकाश सुतार यांना दिली. मिळालेल्या माहितीप्रमाणे तात्काळ स्टाफसह रात्री ११ वाजण्याच्या दरम्यान जागेवर जाऊन खात्री करता हा मृत बिबट्या ट्रॅकच्या शेजारी पडलेला दिसून आला. हा बिबट्या मादी जातीचा असून तो सुमारे दोन ते तीन वर्ष वयाच्या असल्याचा अंदाज आहे. या मृत बिबट्याला ताब्यात घेऊन विभागीय वन अधिकारी रत्नागिरी (चिपळूण) श्रीमती गिरीजा देसाई, सहायक वनसंरक्षक रत्नागिरी (चिपळूण) श्रीमती प्रियंका लगड यांना याबाबतची माहिती देण्यात आली. आज (२५ जुलै) पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रोहित रणभारे यांच्याकडून बिबट्याचे शव विच्छेदन करून घेऊन बिबट्याचे मृत शरीर सर्व अवयवसहित जाळून नष्ट करण्यात आलेले आहेत.
यावेळी रेल्वे पोलिस विभागाचे पीआयआरपीएफ सतीश विधाते, एएसआय आर. एस. चव्हाण, कॉन्स्टेबल प्रवीण कांबळे, अमर मुकादम, कमलेश पाल, निसर्ग प्रेमी व्ही. एस. पवार, रोहन वारेकर, महेश धोत्रे, आशिष कांबळे, प्रेम यादव, वनविभागाचे परिक्षेत्र वन अधिकारी प्रकाश सुतार, वनपाल (पाली) न्हानू गावडे, वनरक्षक (रत्नागिरी) शर्वरी कदम उपस्थित होते.
ही रेस्क्यूची कार्यवाही विभागीय वन अधिकारी रत्नागिरी चिपळूण श्रीमती गिरीजा देसाई तसेच सहाय्यक वनसंरक्षक रत्नागिरी चिपळूण श्रीमती प्रियंका लगड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. अशा प्रकारच्या घटना घडल्यास किंवा वन्यप्राणी अडचणीत सापडल्यास वनविभागाचा टोल फ्री क्रमांक 1926 किंवा 9421741335 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन विभागीय वन अधिकारी रत्नागिरी चिपळूण श्रीमती गिरीजा देसाई यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button