
श्री भैरी देवस्थानतर्फे श्रावणात श्री देव तृणबिंदेकश्वरावर संततधार.
श्री देव भैरी जोगेश्वरी, नवलाई- पावणाई, तृणबिंदूकेश्वर ट्रस्टतर्फे श्रावण महिन्यात श्री देव तृणबिंदूकेश्वरावर सालाबादप्रमाणे अखंड संततधार (रुद्रानुष्ठान) आयोजित केली आहे. याचा प्रारंभ उद्या शुक्रवारी (दि. २५) सकाळी ९ वाजता होणार आहे. दररोज रात्री ९ वाजता आरती होणार आहे. तसेच दर सोमवारी सायंकाळी ६ वाजता आरती होणार आहे. २८ जुलै रोजी सायंकाळी ४ वाजता हभप प्रविण मुळ्ये यांचे कीर्तन होणार आहे. संततधारेची सांगता २४ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता होणार आहे.संततधार अनुष्ठानात, दिवस-रात्र रुद्रमंत्रांचे पठण केले जाते, ज्यामुळे वातावरणात शांतता आणि सकारात्मकता पसरते. अनेक भाविक या अनुष्ठानात सहभागी होऊन तृणबिंदूकेश्वराचे दर्शन घेतात आणि तीर्थप्राशन करतात, ज्यामुळे त्यांची संकटे दूर होतात, असे मानले जाते.
तृणबिंदूकेश्वराच्या पिंडीवर तांब्याच्या अभिषेक पात्रामधून पाण्याची संततधार संपूर्ण श्रावण महिन्यात दिवस-रात्री अखंडपणे सुरू असते. यावेळी गाभाऱ्यात ब्रह्मवृंद रुद्र पठण करत असतात. तृणबिंदूकेश्वराची स्थापना करणाऱ्या मुळे नामक व्यक्तीच्या वंशजांनी ही संततधार परंपरा सुरू केली. ती आजतागायत सुरू आहे. संततधार रुद्रानुष्ठानाच्या कालावधीत दररोज बेल, विविध प्रकारची फुले, फळांची आरास केली जाते. संततधारेकरिता भाविक, दानशूर मंडळींचे सहकार्य लाभते.संपूर्ण श्रावण महिन्यात मंदिरात विविध कार्यक्रम होणार आहेत. ८ ऑगस्टला रात्री ९ वाजता पौती पौर्णिमा, १५ ऑगस्ट रोजी श्रीकृष्ण जन्माष्टमी, रात्री १२ वाजता पवमान व आरती होणार आहे. या सर्व कार्यक्रमांना भाविकांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन ट्रस्टचे अध्यक्ष मुन्नाशेठ सुर्वे यांनी केले आहे.