
लोटेतील उद्योग भवनमध्ये भव्य रोजगार मेळावा संपन्न ३९५ उमेदवारांनी दिल्या मुलाखती, ३४ जणांना थेट नोकरीची संधी.
खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीमधील लोटे परशुराम उद्योजक संघटनेच्या उद्योग भवन इमारतीमध्ये मंगळवार, दिनांक २२ जुलै रोजी रोजगार मेळाव्याचे यशस्वी आयोजन करण्यात आले. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, रत्नागिरी यांच्या वतीने आयोजित या मेळाव्याला मोठा प्रतिसाद लाभला.या मेळाव्याचा शुभारंभ आमदार भास्कर जाधव यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आला. यावेळी सहाय्यक आयुक्त इनुजा शेख, तसेच दीपक लोंढे, मोरेश्वर दुधाळ आणि इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.जिल्ह्यातील दहा आघाडीच्या औद्योगिक आस्थापनांनी एकूण ६३१ रिक्त पदांची नोंदणी या मेळाव्यासाठी केली होती. या उद्योग प्रतिनिधींनी थेट मुलाखती घेऊन पात्र उमेदवारांची निवड केली.राज्य सरकारच्या निर्देशानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून संपूर्ण महाराष्ट्रभर “पंडित दिनदयाळ शर्मा रोजगार मेळावा” हा उपक्रम राबवण्यात आला. त्याचाच एक भाग म्हणून लोटे येथेही रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता.या रोजगार मेळाव्यात संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातून ३९५ बेरोजगार उमेदवार सहभागी झाले. यामधून ७४ उमेदवारांची प्राथमिक निवड, तर ३४ उमेदवारांना विविध आस्थापनांमध्ये थेट नोकरी मिळाली.सहाय्यक आयुक्त इनुजा शेख यांनी यावेळी सांगितले, “राज्य शासनाने दिलेल्या उद्दिष्टांनुसार आम्ही जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात किमान दोन रोजगार मेळावे आयोजित करत आहोत. तसेच रोजगार मार्गदर्शन शिबिरे सुद्धा राबवण्यात येणार आहेत. मेळाव्यानंतर उद्योजकांकडून **पाठपुरावा करून निवड झालेल्या उमेदवारांचा अहवालही संकलित केला जातो.”या उपक्रमामुळे स्थानिक तरुणांना नोकरीची संधी उपलब्ध झाली असून, जिल्ह्यातील उद्योग-विकास व रोजगारनिर्मिती या दोन्ही बाबींना गती मिळण्याची अपेक्षा आहे.*