
युवा पत्रकार मुझम्मील काझी यांना राज्यस्तरीय ‘आदर्श युवा पत्रकार’ पुरस्कार जाहीर, नवी मुंबई येथे होणार सन्मानसोहळा.
रत्नागिरी: रत्नागिरी उक्षी गावचे सुपुत्र, ग्रामीण वार्ताचे संपादक तसेच ग्रामीण पत्रकारितेतील एक दमदार आवाज म्हणून परिचित असलेले मुफनझम्मील काझी यांना “राज्यस्तरीय आदर्श युवा पत्रकार पुरस्कार” जाहीर झाला आहे. हा सन्मान ‘दिशा महाराष्ट्राची’ यूट्यूब व वेब पोर्टल यांच्या वतीने देण्यात येणार असून, नवी मुंबई येथे लवकरच पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे.गेल्या ८ वर्षांपासून मुझम्मील काझी यांनी डिजिटल माध्यमाच्या साहाय्याने कोकणातील ग्रामीण प्रश्न, स्थानिक समस्या, शासकीय अनागोंदी, जनहिताच्या बाबी अत्यंत परखडपणे मांडल्या आहेत. गावागावातील तळागाळातील नागरिकांचे प्रश्न नेमकेपणाने पुढे आणून अनेक वेळा प्रशासनाची दखल घडवून आणण्याचे कार्य त्यांनी केले आहे.गावकुसाबाहेर फारसा न पोहोचणारा आवाज त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून राज्यभर पोहोचवला. सामाजिक भान, अभ्यासू दृष्टिकोन आणि पत्रकारितेतील निष्ठा या तिन्ही आधारस्तंभांवर उभ्या राहिलेल्या त्यांच्या पत्रकारितेची राज्यस्तरीय व्यासपीठावर दखल घेतली गेली आहे.
या पुरस्काराची अधिकृत घोषणा ‘दिशा महाराष्ट्राची’चे मुख्य संपादक तुषार नेवरेकर यांच्या स्वाक्षरीने करण्यात आली. निवड प्रक्रियेत विविध जिल्ह्यांतील तरुण पत्रकारांचे कार्य तपासण्यात आले होते. यातून मुझम्मील काझी यांची निवड ही ग्रामीण पत्रकारितेतील सातत्य, परिणामकारकता आणि जबाबदारीने मांडलेल्या बातम्यांच्या आधारे झाली असल्याची माहिती संयोजकांनी दिली.पुरस्कार जाहीर होताच पत्रकार संघटना, सामाजिक कार्यकर्ते, साहित्यिक, प्रशासकीय अधिकारी, मित्रपरिवार व वाचकवर्ग यांच्याकडून मुझम्मील काझी यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या आहेत.गावाच्या मातीशी नाळ घट्ट जोडलेली असूनही विचारांची आकाशझेप घेणारे पत्रकार म्हणून मुझम्मील काझी यांचे नाव आज राज्यभर चर्चेत आले आहे. ग्रामीण पत्रकारितेतील त्यांच्या योगदानाचे हे राज्यस्तरीय मानांकन ही एक अभिमानास्पद बाब ठरत आहे.पत्रकारिता ही केवळ बातम्या देणारी कला नसून, ती लोकशाहीचे भान टिकवणारी आणि समाजाला जागं ठेवणारी भूमिका बजावते, हे कार्य युवा पत्रकार मुझम्मील काझी आपल्या कामातून सिद्ध करत आहेत.