
मासेमारी बंदी कालावधी 15 ऑगस्टपर्यंत वाढवा
इंडियन वेस्ट कोस्ट फिशरमेन फेडरेशनमधील महाराष्ट्र आणि गुजरात राज्याच्या शिष्टमंडळाने बुधवारी राज्याचे मत्स्य व्यवसायमंत्री नीतेश राणे यांची मंत्रालयात भेट घेऊन पावसाळी मासेमारी बंदी कालावधी गुजरात राज्याच्या धर्तीवर 15 ऑगस्ट पर्यंत करण्याची मागणी केली.गुजरात राज्याने पावसाळी मासेमारी बंदी कालावधी 1 जून ते 15 ऑगस्ट केल्याने शाश्वत मासेमारीला चालना मिळत असल्याने मासळी साठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ होत असून महाराष्ट्रातही पावसाळी मासेमारी बंदी 15 ऑगस्टपर्यंत करण्याची मागणी सर्व पारंपारिक मच्छीमारांकडून जोर धरू लागली आहे. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या दोन आठवड्यांत वादळी वारे मोठ्या प्रमाणात होत असतात, ज्यामुळे समुद्र खवळलेला असतो. ज्यामुळे मच्छिमारांची जीवितहानी तसेच नौकांचे नुकसानी टाळण्याकरिता पावसाळी मासेमारी बंदी कालावधी 15 ऑगस्टपर्यंत करण्याची रास्त मागणी उपस्थित मच्छिमारांकडून करण्यात आली आहे.