
मराठी माणसांना आपटून मारु’ म्हणणाऱ्या दुबेंना महाराष्ट्राच्या महिला खासदारांनी दाखवला इंगा
राज्यातील हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर सुरू झालेल्या वादात विनाकारण उडी घेऊन ‘मराठी माणसा’ला डिवचणारे भारतीय जनता पार्टीचे झारखंडमधील खासदार निशिकांत दुबेंना बुधवारी मराठी खासदारांनी धडा शिकवल्याचं चित्र पाहायला मिळालं.संसद भवनात त्यांना अचानक गाठून घेराव घालत वादग्रस्त विधानांचा जाब विरोधी पक्षांच्या महिला खासदारांनी विचारला. ‘जय महाराष्ट्र’ च्या घोषणांनी संसद भवनाची लॉबी दणाणून गेली अन् दुबे यांना तेथून चक्क काढता पाय घ्यावा लागलादुबेंना बुधवारी मराठी महिला खासदारांनी खिंडीत गाठले. विरोधकांच्या गदारोळामुळे लोकसभेचे कामकाज तहकूब झाल्यानंतर वर्षा गायकवाड, शोभा बच्छाव, प्रतिभा धानोरकर या काँग्रेसच्या खासदार दुबे यांना शोधत होत्या. दुबे लॉबीमध्ये येताच तिघींनी त्यांना घेराव घातला आणि त्यांच्या विधानांबाबत जाब विचारला.
महिला खासदार दुबेंना काय म्हणाल्या?
“मराठी लोकांना मारण्याची भाषा कशी करू शकता? तुम्ही आपटून आपटून कुणाला आणि कसे मारणार? कसली ही तुमची अर्वाच्च भाषा ? तुमचे वागणे-बोलणे योग्य नाही… मराठी भाषकांविरोधातील तुमची ही अरेरावी आम्ही खपवून घेणार नाही” अशा शब्दांत गायकवाड यांनी दुबेंना सुनावले. यानंतर या महिला खासदारांनी ‘जय महाराष्ट्र’ अशी घोषणाबाजी केली. अचानक झालेल्या या साऱ्या प्रकारामुळे दुबे गोंधळून गेले आणि त्यांनी तिथून काढता पाय घेतला.